मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत दहा संघांचा सहभाग असून रॉबिन राउंड पद्धतीने साखळी फेरीचे सामने होणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांसोबत सामना करणार आहे. यापैकी टॉपला असलेल्या चार संघ उपांत्य फेरीत धडक मारणार आहेत. साखळी फेरीत एकूण 45 सामने होतील. त्यानंतर उपांत्य फेरीचे दोन आणि अंतिम फेरीचा एक सामना असे एकूण 48 सामने होतील. या स्पर्धेत जेतेपदासाठी काही संघांना पसंती दिली जात आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या आठवणी जागा केल्या जात आहेत. वनडे फॉर्मेट पूर्वी 60 षटकांचा होता. त्यानंतर तो 50 षटकांचा झाला. त्यानंतर गेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अंतिम फेरीत झालेल्या सुपर ओव्हर आणि धक्कादायक निर्णय सर्वांच्या लक्षात आहे. त्यामुळे 2023 मध्ये कोणता वाद डोकं वर काढेल सांगता येत नाही. दुसरीकडे 1996 मध्ये झालेल्या वर्ल्डकपची आठवण काढली जात आहे. कारण या सामन्यात दोन संघ सामना खेळताच पराभूत झाले होते.
वनडे वर्ल्डकप 1996 मध्यो दोन संघ सामना न खेळताच पराभूत झाले होते. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघांनी एक सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर विरोधी संघांना विजयी घोषित केलं होतं. वनडे वर्ल्डकप 1996 मध्ये पाचवा सामना 17 फेब्रुवारीला श्रीलंका आणि ऑस्ट्रलिया यांच्यात होणार होता. पण हा सामना झाला नाही आणि श्रीलंकेला विजयी घोषित केलं.
वनडे वर्ल्डकप 1996 स्पर्धेतील 15 वा सामना वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात होणार होता. पण या सामन्यातही श्रीलंकेला सामना न खेळताच विजयी घोषित करण्यात आलं. पण नेमकं असं काय झालं होतं की श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. चला जाणून घेऊयात या मागचं कारण..
श्रीलंकेच्या उत्तर भागात लिट्टे आणि लष्करात युद्ध सुरु होतं. यात 18 जुलै ते 25 जुलै 1996 दरम्यान काही ठिकाणी ब्लास्ट झाले. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने कोलंबोत खेळण्यास नकार दिला. त्यामुळे श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं.
1996 वर्ल्डकपचा अंतिम सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. श्रीलंकेनं अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला मात दिली. तसेच वनडे वर्ल्डकपवर पहिल्यांदा नाव कोरलं. यावेळी श्रीलंकेचं कर्णधारपद अर्जुना रणतुंगा याच्याकडे होतं.