वनडे वर्ल्डकप सुरु असताना चार संघांना चॅम्पियन ट्रॉफीचं टेन्शन, जर तरच्या गणितामुळे चुरस वाढली

| Updated on: Nov 08, 2023 | 9:29 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचं गणित जवळपास सुटलं आहे. पण आता चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी गणित फिस्कटल्याचं दिसून येत आहे. बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँड आणि इंग्लंडमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

वनडे वर्ल्डकप सुरु असताना चार संघांना चॅम्पियन ट्रॉफीचं टेन्शन, जर तरच्या गणितामुळे चुरस वाढली
वनडे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात पण चॅम्पियन ट्रॉफीचं गणित समोर, कसं आहे समीकरण ते जाणून घ्या
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असून आता अंतिम टप्पा सुरु आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाचा आता शेवटचा सामना उरला आहे. त्यामुळे आता चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी चुरस निर्माण झाली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी गुणतालिकेतील टॉप 8 संघ पात्र ठरणार आहेत. त्यापैकी सहा संघांचं निश्चित झालं आहे. पण उर्वरित दोन संघांसाठी चार संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान हे संघ पात्र ठरले आहेत. पण उर्वरित दोन संघासाठी बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँड आणि इंग्लंड यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. तळाच्या या चारही संघांचे 4 गुण आहेत. त्यात प्रत्येक संघांचा एक सामना शिल्लक असून टॉप 8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे.

स्थान मिळवण्यासाठी चार संघात चुरस

  • बांगलादेशचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बांगलादेशने हा सामना जिंकला तर चॅम्पियन ट्रॉफीतील स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, हा सामना बांगलादेशनं गमावला तर चॅम्पियन ट्रॉफीचं गणित कठीण होईल. नेदरलँड, श्रीलंका आणि इंग्लंडच्या कामगिरीवर लक्ष असेल.
  • नेदरलँडचा शेवटचा सामना भारताशी होणार आहे. भारताने आतापर्यंत 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. सामना जिंकून साखळी फेरीचा शेवट गोड करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. नेदरलँडने हा सामना गमवला तर बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंडच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
  • श्रीलंकेचा शेवटचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडला उपांत्य फेरीसाठी तर श्रीलंकेला चॅम्पियन ट्रॉफीत पात्र ठरण्याासाठी हा विजय महत्त्वाच आहे. श्रीलंकेला विजय मिळवण्यासोबत नेट रनरेटवरही लक्ष ठेवावं लागेल. पराभव झाल्यास बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलँडच्या सामन्याकडे लक्ष असेल.
  • इंग्लंडचा शेवटचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना नेट रनरेट महत्त्वाचा आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने पराभूत करण्यासाठी चढाओढ असेल. इंग्लंड पराभूत झाल्यास चॅम्पियन ट्रॉफीचं स्वप्न भंगेल. दुसरीकडे, पाकिस्तान पराभूत झाल्यास वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धाा पाकिस्तानात होणार आहे. आयसीसीने या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला 2021 मध्ये दिलं आहे. चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा ही वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर सर्वात मोठी स्पर्धा आहे. 2017 मध्ये पाकिस्तानने भारताला अंतिम फेरीत पराभूत केलं होतं.