टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोठ्या उलटफेरांसह बरंच काही पाहायला मिळालं आहे. भारताने पाकिस्तानला दिलेलं 119 धावांचं सोपं आव्हानही गाठता आलं नाही. खेळपट्ट्यांबाबत तर खूपच संभ्रमाची स्थिती आहे. असं असताना कोणता संघ कोणावर भारी पडेल सांगता येत नाही. त्यात सुपर 8 फेरीसाठीची चुरस वाढत आहे. सुपर 8 फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघांची चढाओढ सुरु झाली आहे. असं असताना 20 पैकी अधिकृतरित्या एक संघ बाद झाला आहे. ब गटातून ओमान हा संघ बाद झाला. ओमानने साखळी फेरीतील सुरुवातील खेळलेल्या तीन पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात विजय मिळवूनही काहीच फायदा नाही. त्यामुळे या स्पर्धेतून बाद होणारा अधिकृतरित्या पहिला संघ ठरला आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ब गटात स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, इंग्लंड आणि ओमान हे संघ आहेत. या गटातील साखळी फेरीत स्कॉटलँड आणि ओमान हे संघ आमनेसामने आले होते. ओमानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 150 धावा केल्या आणि विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान स्कॉटलँडने 41 चेंडू राखून पूर्ण केलं. स्कॉटलँडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत 13.1 षटकात हे टार्गेट पूर्ण केलं. त्यामुळे नेट रनरेटमध्ये स्कॉटलँडला फायदा झाला आहे. तर इंग्लंडचा पुढचा प्रवास बिकट झाला आहे. इंग्लंडने सध्या दोन सामने खेळले असून फक्त 1 गुण आहे. तर स्कॉटलँडने तीन सामन्यात 5 गुणांची कमाई केली आहे. इंग्लंडने पुढचे दोन सामने जिंकले तरी पाचच गुण होतात. त्यात स्कॉटलँडचा नेट रनरेट चांगला असल्याने इंग्लंडला फटका बसू शकतो.
ओमान (प्लेइंग इलेव्हन): नसीम खुशी, प्रतीक आठवले (विकेटकीपर), आकिब इलियास (कर्णधार), झीशान मकसूद, खालिद कैल, अयान खान, मेहरान खान, रफिउल्लाह, शकील अहमद, कलीमुल्लाह, बिलाल खान.
स्कॉटलंड (प्लेइंग इलेव्हन): जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्ह्ज, मार्क वॉट, क्रिस्टोफर सोले, सफ्यान शरीफ, ब्रॅड व्हील.