मुंबई : पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात डेविड वॉर्नरची बॅट चांगलीच तळपळी. पर्थमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतकी खेळी करत २६ वं शतक ठोकलं. जवळपास एक वर्षानंतर डेविड वॉर्नरला शतकी खेळी करण्यात यश आलं आहे. डेविड वॉर्नरने २५ वं कसोटी शतक दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २७ डिसेंबरला मारलं होतं. त्यात त्याने २०० धावांची खेळी केली होती. २०२२ मध्ये डेविड वॉर्नरने ३०.०५ च्या सरासरीने ५७१ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. आता पाकिस्तानविरुद्ध ३५२ दिवासांनी शतक ठोकलं आहे. डावखुऱ्या डेविड वॉर्नरने ४३ व्या षटकात चौकार मारत कसोटीतील २६ वं शतक ठोकलं आहे. यासाठी १२५ चेंडूंचा सामना केला.
डेविड वॉर्नरने शतकी खेळीसह पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकला मागे सोडलं आहे. तर वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स याची बरोबरी केली आहे. इंजमाम उल हकने कसोटीत २५, तर गॅरी सोबर्सने २६ शतकं ठोकली आहेत. वॉर्नरने ११० व्या कसोटी सामन्यात हा पल्ला गाठला आहे. तर इंजमामने यासाठी १२० सामने खेळले होते. तर गॅरी सोबर्सने ९३ व्या कसोटी सामन्यात २६ वं षटक ठोकलं होतं. आता वॉर्नरच्या निशाण्यावर एलन बॉर्डरचा रेकॉर्ड असून त्याने १५६ कसोटीत २७ शतकं ठोकली आहेत.
David Warner to his critics 👇pic.twitter.com/nJA2fMXNvM
— Johns. (@CricCrazyJohns) December 14, 2023
दुसरीकडे, वॉर्नरने शतक ठोकत विरोधकांची तोंडं बंद केली आहेत. शतकी खेळीनंतर हवेत उडी घेत किस केलं. वॉर्नरचे चाहते हा व्हिडीओ पोस्ट करत आहेत. वॉर्नरने टी ब्रेक दरम्यान सांगितलं की, “येथे येणं आणि धावा करणं माझं काम आहे. शतकी खेळी करणं एक चांगली अनुभूती आहे. विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग नाही.”
डेविड वॉर्नर आपल्या कसोटी कारकिर्दितील शेवटचा सामना खेळत आहे. तीन सामन्याती शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये होणार आहे. यानंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार आहे. वॉर्नरने ही कसोटी मालिका शेवटची असेल असं जाहीर केलं आहे.