पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाकिस्तानने खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 3.4 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 9 धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडे 21 धावांची आघाडी आहे. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक याने 10 बॉलमध्ये 3 धावा केल्या. तर खुर्रम शहजाद याला भोपळाही फोडता आला नाही. खुर्रम आऊट होताच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचं जाहीर करण्यात आलं. सॅम अय्युब 6 धावांवर नाबाद परतला. बांगलादेशकडून हसन महमुद याने दोन्ही विकेट्स घेतल्या. बांगलादेश मालिकेत आधीच 1-0 ने आघाडीवर आहे. तसेच बांगलादेश या सामन्यात भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे बांगलादेशकडे पाकिस्तानला शक्य तितक्या लवकर रोखून मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकण्याची संधी आहे.
पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 274 धावा केल्या. बांगलादेशची प्रत्युत्तरात घसरगुंडी झाली. बांगलादेशची 6 बाद 26 अशी नाजूक स्थिती झाली होती. त्यामुळे पाकिस्तानला 200 पेक्षा अधिक धावांची मोठी आघाडी मिळण्याची संधी होती. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज याने तसं होऊ दिलं नाही.या दोघांनी खऱ्या अर्थाने मॅच फिरवली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी बांगलादेशच्या डावातील टर्निंग पॉइंट ठरला. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशला पहिल्या डावात 78.4 ओव्हरमध्ये 262 धावा करता आल्या.
बांगलादेशसाठी लिटन दास आणि मेहदी हसन मिराज या दोघांनीच सर्वाधिक धावा केल्या. लिटनने 138 धावांचं योगदान दिलं. तर मेहदीने 78 रन्सचं योगदान दिलं. हसन महमुद 13 धावांवर नाबाद परतला. तर शादमन इस्लाम याने 10 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाज फुस्स ठरले. पाकिस्तानकडून खुर्रम शाहजाद याने 6 विकेट्स घेतल्या. तर मीर हामझा आणि आणि आघा सलमान या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.
सामना रंगतदार स्थितीत
At the end of day three, Pakistan lead by 21 runs for the loss of two wickets 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/yWdqc6E6hO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.