लाहोर | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. बांगलादेश विरुद्ध पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बॉलिंगची दहशत पाहायला मिळाली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बांगलादेशला 38.4 ओव्हरमध्ये गुंडाळलंय. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी 10 पैकी 9 विकेट्स घेतल्या. बांगलादेशला ऑलआऊट 193 धावाच करता आल्या. त्यामुळे आता पाकिस्तानला सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करण्यासाठी 194 धावा कराव्या लागणार आहेत.
बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फोल ठरला. बांगलादेशने झटपट 4 विकेट्स गमावल्या. मेहदी हसन 0, लिटॉन दास 16, मोहम्मद नईम 20 आणि तॉहिद हृदाय 2 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे बांगलादेशची 4 बाद 47 अशी स्थिती झाली. मात्र कॅप्टन शाकिब अस हसन आणि मुशफिकर रहीम या दोघांनी अनुभवाच्या जोरावर पाकिस्तानच्या बॉलिंगचा हल्ला परतवून लावला. या दोघांनी डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी शतक भागीदारी केली. त्यामुळे बांगलादेशचा डाव स्थिरावला. मात्र फहीम अश्रफ याने ही जोडी फोडली.
शाकिब अल हसन याने 57 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. ही जोडी फुटल्यानंतर पाकिस्तान पुन्हा बांगलादेशवर हावी झाली आणि टीमला ऑलआऊट केलं. शमीम हौसेन 16 रन्स करुन माघारी परतला. मुशफिकर रहीम याने 64 धावांची झुंजार खेळी केली. तास्किन अहमद याला भोपळाही फोडता आला नाही. अफिफ होसैन याने 12 धावांचं योगदान दिलं. तर हसन महमुद 1 धावेवर नाबाद परतला. तर पाकिस्तानकडून हरीस रौफ याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नसीम शाह याने 3 विकेट्स घेतल्या. तर शाहिन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1 विकेट गेली.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणि हरीस रौफ.