पाकिस्तान क्रिकेट टीमने बाबर आझम याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप मोहिमेचा शेवट विजयाने केला. पाकिस्ताने साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध 3 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी मिळालेलं 107 धावांचं आव्हान हे 7 विकेट्सने गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानला हे आव्हान पूर्ण करण्यातही नाकी नऊ आले होते. मात्र कसेबसे जिंकले. पाकिस्तानचा हा एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. मात्र यानंतरही पाकिस्तानला सुपर 8 मध्ये पोहचता आलं नाही. पाकिस्तानचा गाशा गुंडाळल्यानंतर कॅप्टन बाबर आझमने कॅप्टन्सी सोडण्याबाबत स्पष्टच भूमिका मांडली.
रविवारी 16 जून रोजी सामना पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. बाबरने या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तर देतांना कर्णधारपदाबाबतही प्रतिक्रिया दिली. “जेव्हा मी याआधी कॅप्टन्सी सोडली होती, तेव्हा मला वाटलं होतं की आपण आता कर्णधार रहायला नको, तशी मी घोषणा केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मला कॅप्टन केलं हा त्यांचा निर्णय होता. आता मी पुन्हा कर्णधारपद सोडंल, तर मी सांगेन. मी आतापर्यंत कर्णधारपद सोडण्याबाबत निर्णय घेतलेला नाही हा निर्णय पीसीबीला घ्यायचा आहे”, असं बाबरने स्पष्ट केलं.
भारतात 2023 साली आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवाची जबाबदारी घेत बाबर आझमने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर बाबरच्या जागी शाहिन शाह अफ्रिदी याची नियुक्ती करण्यात आली. मात्र शाहिनलाही नेतृत्वाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडता आली नाही. त्यामुळे पीसीबीने बाबरची मार्च 2024 मध्ये कर्णधारपदी फेरनियुक्ती केली.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.