Muhammad Rizwan | वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेटर मोहम्मद रिझवान याचं गाजा प्रेम

| Updated on: Oct 12, 2023 | 12:01 AM

Muhammad Rizwan Gaza | पाकिस्तान क्रिकेट टीम तब्बल 7 वर्षांनी वर्ल्ड कपच्या निमित्ताने भारतात आलीय. मात्र मोहम्मद रिझवान याने केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय.

Muhammad Rizwan | वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेटर मोहम्मद रिझवान याचं गाजा प्रेम
Follow us on

हैदराबाद | पाकिस्तान क्रिकेट टीमने मंगळवारी 10 ऑक्टोबरला श्रीलंकेवर आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 6 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा आणि सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. श्रीलंकाने पाकिस्तान विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 48.2 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. अब्दुल्लाह शफीक आणि मोहम्मद रिझवान ही जोडी पाकिस्तानच्या विजयाची शिल्पकार ठरली. अब्दुल्लाह शफीक याने 103 बॉलमध्ये 113 धावांची शतकी खेळी केली. तर रिझवानने 121 बॉलमध्ये नॉट आऊट 131 रन्स केल्या.

मोहम्मद रिझवान याने पाकिस्तानच्या विक्रमी विजयानंनतर एक ट्विट केलं. मोहम्मद रिझवान याने हे शतक हे गाजामधील बंधुंसाठी समर्पित केलं. मोहम्मद रिझवान याने ट्विटमध्ये त्याने हैदराबादमधील लोकांचे आभारही मानले. मोहम्मद रिझवान याचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय. मोहम्मद रिझवान याने आपल्या ट्विटमध्ये नक्की काय म्हटलंय हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

मोहम्मद रिझवान याने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“हे गाजामधील आमच्या बंधुभगिणींसाठी आहे. विजयात योगदान देऊन मी आनंदी आहे. पाकिस्तानचा विजय सोपं करण्याच श्रेय हे अब्दुल्ला शफीक आणि हसन अली या दोघांचं आहे. जोरदार समर्थनासाठी मी हैदराबादमधील चाहत्यांचा आभारी आहे”, अशा आशयाचं ट्विट मोहम्मद रिझवान याने केलं आहे.

मोहम्मद रिझवान याचं ट्विट

सोशल मीडियावरुन जोरदार हल्लाबोल

दरम्यान मोहम्मद रिझवान याच्यावर या ट्विटनंतर जोरदार आणि सडकून टीका केली जात आहे. तसेच कौतुकही केलं जात आहे. “टीम इंडियाचा महेंद्रसिंह धोनी याच्यसोबत 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये एक प्रकार घडला होता. धोनीच्या ग्लोव्हजवर सैन्य दलाचं चिन्ह असल्याने धोनीला तो ग्लोव्हज घालण्यास मनाई करण्यात आली होती”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. धोनीच्या ग्लोव्हजवर भारतीय सैन्याचं चिन्ह होतं. आयसीसीने यावरुन आक्षेप घेतला होता. आयसीसीने धोनीला ते चिन्ह ग्लोव्हजनवरुन हटवण्यास सांगितलं होतं.

तसेच एका व्यक्तिने मोहम्मद रिझवान याचं या कृतीसाठी कौतुक केलंय. “काय माणूस आहे. दुर्बळ माणसांसाठी बोलणाऱ्या रिझवान याच्या शौर्याला सलाम”, असं एका यूझर्सने म्हटलंय.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.