मुंबई | टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेआधी पाकिस्तान टीमला मोठा झटका लागला आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज असद शफीक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागलाय. असद गेल्या अनेक वर्षांपासून टीममधून बाहेर होता.
असद शफीक याने गेल्या रविवारी कराची व्हाईट्स टीमला नॅशनल टी 20 चॅम्पियनशीप विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर असदने पत्रकार परिषेदत संवाद साधला. असदने या दरम्यान निवृत्तीबाबत म्हटलं. “मला आता क्रिकेट खेळण्यात उत्साह जाणवत नाही. तसेच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक फिटनेसही नाही. त्यामुळे मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, असं असदने स्पष्ट केलं.
तसेच असदने निवृत्ती जाहीर करताना लवकरच आपली पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याचे संकेतही दिले. “पीसीबीने त्याबाबतचा करार आणि ऑफर लेटर पाठवलंय. मी त्या ऑफरबाबत विचार करतोय. आशा आहे की मी लवकरच ऑफर स्वीकारेन”, असंही असदने सांगितलं. निवड समिती अध्यक्षपदी काम करणं आव्हानात्मक आहे, असं असजला वाटतं. तसेच क्रिकेटसह कोणत्या कोणत्या प्रकारे संपर्कात रहावं अशी असदची इच्छा आहे.
दरम्यान असद शफीक याने पाकिस्तानचं 77 कसोटी, 60 वनडे आणि 10 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. असदने कसोटीत 4 हजार 660, वनडेत 1 हजार 336 आणि टी 20 मध्ये 192 धावा केल्या आहेत. तसेच असदने टेस्टमध्ये 3 विकेट्सही घेतल्या आहेत.
असद शफीकला गार्ड ऑफ ऑनर
A guard of honour for Karachi Whites captain Asad Shafiq 🫡#NationalT20 | #AajaMaidanMein pic.twitter.com/QgNTc6BX2F
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 10, 2023
दरम्यान पाकिस्तान ऑस्ट्रेलिया विरुद्ध नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात कसोटी मालिकेत खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका असणार आहे. या मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे.