मुंबई : यंदाच्या वनडे वर्ल्ड कप 2023 साठी सर्व संघ तयारीला लागले असून टीम मॅनेजमेंट संघ बांधणी करत आहे. 2011 नंतर म्हणजेच 12 वर्षांनी भारतात आयसीसी वर्ल्ड कप होणार आहे. वर्ल्ड कप संघामध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही अनुभवी खेळाडूही आता संघाच्या बाहेर आहेत त्यांनाही आता संघात जागा मिळवण्यासाठी हातपाय हलवावे लागणार आहेत. अशातच पाकिस्तान संघाच्या खेळाडूने संघातील निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मला आयसीसी टूर्नामेंट्समध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. यामुळे मला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी काय करावे लागतं हे माहित आहे. मी 29 वर्षांचा झालो असलो तरी, माझा फिटनेस चांगला असून मी दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने म्हटलं आहे.
पाकिस्तानला 2017 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हसन अलीच्या या वक्तव्याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा आहे. चॅम्पियन ट्रॉफीत हसन अलीने सर्वाधिक 13 विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानकडून खेळताना त्याने 60 वनडे सामन्यांमध्ये 91 विकेट घेतल्या आहेत. पाकिस्तान संघात सरस गोलंदाजांची फौजच आहे. नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रऊफ सारखे चांगल्या फॉर्ममध्ये असलेले गोलंदाज असताना हसन अलीचे टीममध्ये पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे.
भारताच्या 12 शहरामंध्ये विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 10 संघ मैदानात उतरणार आहेत. 3 नॉकआउट सामन्यांसह एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत. नुकतेच आयसीसीने (ICC) वनडे वर्ल्ड कप 2023 चा लोगो प्रसिद्ध केला. हा लोगो ‘नवरसा’ च्या रुपात दाखवला आहे. हे नवरस म्हणजेच सम्मान, आनंद, आश्चर्य, शौर्य, दुःख, सामर्थ्य, अभिमान, गौरव, उत्कटता हे आहेत.
दरम्यान, भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. रोहित अँड कंपनीसाठी मोठी संधी असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंवर टीम इंडियाची मदार असणार आहे.