ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकताच पाकिस्तानचा कर्णधार रिझवानचं आश्चर्यकारक विधान, म्हणाला…

| Updated on: Nov 10, 2024 | 6:05 PM

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकून इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी पाकिस्तानचा संघ टीकेचा धनी ठरला होता. मात्र इंग्लंड दौऱ्यानंतर पाकिस्तान संघात बदल दिसून आला आहे. आता मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात 2-1 ने वनडे मालिका जिंकली. या नंतर रिझवानने आपलं मत व्यक्त केलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकताच पाकिस्तानचा कर्णधार रिझवानचं आश्चर्यकारक विधान, म्हणाला...
Follow us on

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकली. पहिल्या सामना गमावल्यानंतर पाकिस्तान कमबॅक करेल की नाही याबाबत शंका होती.मात्र पाकिस्तानने सलग दोन वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवलं. पाकिस्तानने 22 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात वनडे मालिका जिंकून इतिहास रचला आहे. या मालिकेपूर्वीत पाकिस्तान संघात उलथापालथ झाली होती. तसेच मोहम्मद रिझवानच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली होती. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने पहिल्याच मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तान संघाला चांगले संकेत मिळाले आहेत. मालिका जिंकल्यानंतर कर्णधार मोहम्मद रिझवानने आपलं मन मोकळं केलं. ‘ऐतिहासिक मालिका विजय माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. आज संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही वर्षात आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाहीत. आता संघ चांगली कामगिरी करत आहे. मी नवा कर्णधार असलो तरी फक्त नाणेफेक आणि सादरीकरण एवढाच भाग आहे. प्रत्येक खेळाडू मला क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजीत सल्ला देतो. विजयाचं श्रेय गोलंदाजांना जाते.’

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोस इंग्लिसने आपलं परखड मत व्यक्त केलं. ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर खूपच निराशाजनक, मला वाटते पहिल्या गेमच्या पहिल्या तीन क्वार्टरनंतर आम्ही पूर्णपणे निष्फळ ठरलो. शेवटच्या काही सामन्यांमध्ये फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. फलंदाजीची त्यांची स्वतःची पद्धत आहे, परंतु धावा करणे, तसेच डाव खोलवर घेऊन जाणे आणि निकाल मिळवणे महत्त्वाचे आहे. पर्थ येथे माझ्या घरच्या चाहत्यांसमोर कर्णधारपद भूषवताना आनंद झाला, पण त्याचा परिणाम निराशाजनक झाला.’

तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाला 31.5 षटकात 140 धावांवर रोखलं. तसेच दिलेलं आव्हान पाकिस्तानने 26.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर हारीस रउफने 2 आणि हसनैनने एक गडी बाद केला. तर फलंदाजीत सइम अयुबने 42 आणि अब्दुल्ला शफीकने 37 धावा केल्या. तर बाबर आझम नाबाद 28 आणि मोहम्मद रिझवान नाबाद 30 धावांवर राहून विजय मिळवून दिला.