मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. बांगलादेशला 32.3 षटकात पराभूत केल्याने नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. यासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तानपेक्षा चांगला नेट रनरेट असल्याने पाकिस्तान सातव्या स्थानावरून थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. पण असं असलं तरी उपांत्य फेरीचं गणित वाटतं तितकं सोपं नाही. पाकिस्तानकडे फक्त 6 गुण आहेत आणि आता दोन सामने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन सामने जिंकले की एकूण 10 गुण होतील. पण असं असलं तरी पाकिस्तानची उपांत्य फेरीची वाट बिकट आहे. कारण टॉप असलेल्या भारताचे 12 गुण आणि दक्षिण अफ्रिकेचे 10 गुण आहेत. त्यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या जय पराजयावर सर्व काही अवलंबून असणार आहे.
पाकिस्तानला उर्वरित दोन सामने न्यूझीलंड आणि इंग्लंडसोबत खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर 10 गुण होतील. पण टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी भारत आणि अफगाणिस्तानवर अवलंबून राहावं लागणार आहे. भारताने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. चला समजून घेऊयात उपांत्य फेरीचं गणित कसं असेल ते..
इंग्लंड आणि बांगलादेश यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरुवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. श्रीलंकेचे 4 गुण असून सातव्या स्थानावर आहे. भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यास श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे पाकिस्तानच्या वाटेतील एक संघ दूर होईल. तर पाकिस्तान दोन सामन्यात विजय मिळवत 10 गुणांसह वरचढ ठरू शकतो.
अफगाणिस्तान गुणतालिकेत पाकिस्तानच्या बरोबर खालोखाल आहे. अफगाणिस्तानचे तीन सामने उरले असून त्यात विजय मिळला तर 12 गुण होतील आणि उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. त्यामुळे अफगाणिस्तानने तीन पैकी दोन सामन्यात पराभूत व्हावं अशीच पाकिस्तानी क्रीडाप्रेमींची इच्छा असेल. त्यामुळे अफगाणिस्तानला 8 गुणांवर समाधान मानावं लागेल. जर दोन सामन्यात विजय मिळवला तर मात्र नेट रनरेट महत्त्वाचा ठरेल.