आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिल्या डबल हेडरचं आयोजन हे 23 मार्च रोजी करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्यात सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. या सामन्यादरम्यान क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी बॉलिंग ऑलराउंडर खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या 4 महिन्यांनी या बॉलिंग ऑलराउंडरने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. क्रिकेटरने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा बॉलिंग ऑलराउंडर इमाद वसीम याने 4 महिन्यात निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आगामी वर्ल्ड कपसाठी आपण देशासाठी उपलब्ध असल्याचं त्याने जाहीर केलंय. इमादने नुकत्याच पार पडलेल्या पीएसएल लीगमध्ये इस्लामाबाद यूनायटेडला चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका पार पाडली. ईमादने नोव्हेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत परदेशी लीग क्रिकेट स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र इमादचा 4 महिन्यातच निर्णय बदलला.
इमादने इंस्टा पोस्टमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं म्हटलं. “मी पीसीबी अधिकाऱ्यांना भेटलो. मी या भेटीनंतर निवृत्तीचा निर्णय बदलला. तसेच टी 20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत मी पाकिस्तानसाठी उपलब्ध असेन. मला आनंद होत आहे”, असं इमादने म्हटलंय. तसेच इमादने पीसीबीचे अधिकाऱ्यांचेही आभार मानले. “पीसीबीने माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी त्यांचा आभारा आही. माझ्या देशाचा गौरव करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन. पाकिस्तान पहिला!”, असं इमादने म्हटलं.
इमादची सोशल मीडिया पोस्ट
दरम्यान इमादने पाकिस्तानचं 55 एकदिवसीय आणि 66 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. इमादने या वनडे आणि टी 20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 986 आणि 486 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 44 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इमादने पाकिस्तानसाठी टी 20 आणि वनडे या दोन्ही फॉर्मेटमध्ये प्रत्येकी 1 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.