मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. 2023 ते 2025 या कालावधीत 9 संघांमध्ये कसोटी सामने खेळले जाणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळणार आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी दोन गाठली. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. पहिल्यांदा न्यूझीलंडने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं. तिसऱ्या पर्वातही भारत अंतिम फेरी गाठेल अशीच स्थिती असून सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत विजयी टक्केवारी 100 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघाची विजयी टक्केवारी 66.67 टक्के असून दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना आपलं स्थान कायम ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. पाकिस्तानने श्रीलंकेला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केलं होतं. तर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती. तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे विजयी टक्केवारीत घसरण झाली.
पाकिस्तानला आता आपलं अव्वल स्थान कामय ठेवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात मातीत पराभूत करण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर असेल. तीन सामन्यांची मालिका 3-0 गमावली तर पाकिस्तानला मोठा फटका बसेल. दुसरीकडे, मालिका बरोबरीत सुटली किंवा एखादा सामना ड्रॉ झाला तरी विजयी टक्केवारीवर परिणाम होईल. त्यामुळे पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान असणार आहे. तसेच बांगलादेश न्यूझीलंड कसोटी मालिकेचाही परिणाम दिसून येईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर, दुसरा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर आणि तिसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. तर भारतीय संघही दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वा कसोटी संघाची घोषणा झाली आहे. भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर आणि दुसरा कसोटी सामना 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे.
कसोटीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.