मुंबई | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. भारताला आयसीसी स्पर्धेचं 2011 नंतर यजमानपदाचा मान मिळाला आहे. या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचं भारतातील 10 शहरांमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामनाही इथेच होणार आहे.
वर्ल्ड कप वेळापत्रक जाहीर होऊन आता 24 तासांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. मात्र त्यानंतरही एक प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट टीम भारतात येणार की नाही. आतापर्यंत पाकिस्तानने भारतात येण्याबाबत अनेक नखरे केले आहेत. त्यामुळे पाकिस्तान भारतात येऊन खेळणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहेच. आयसीसीने पाकिस्तानला स्पष्ट भाषेत विचारणा केलीय. मात्र यानंतरही पाकिस्तानचं ठरलेलं नाही. टीमने भारतात येऊन खेळायचं की नाही, हा पाकिस्तान सरकार ठरवणार आहे. त्यामुळे सरकारच्या परवानगीची प्रतिक्षा केली जात आहे.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला परवानगी मिळाली नाही, तर काय? पाकिस्तानऐवजी कोणत्या टीमला खेळण्याची संधी मिळेल, असे प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडले आहेत. याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
पाकिस्तान आयसीसी वर्ल्ड कप खेळण्यााठी भारतात येईल, अशा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र प्रत्येक संघ हा आपल्या देशांमधील नियमांना बांधील आहे, असंही आयसीसीने म्हटलंय. मात्र त्यानंतरह पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली नाही तर काय होईल? पाकिस्तानशिवाय फक्त 9 संघांमध्येच वर्ल्ड कप स्पर्था होणार का?
पाकिस्तानने खेळण्यास नकार दिल्यानंतर कोण खेळणार याबाबतचं वृत्त टाईम्स नावने आयीसीसी सूत्रांच्या हवाल्याने दिलंय. पाकिस्तानने वर्ल्ड कपमधून हिट विकेट आऊट होण्याचा निर्णय घेतला, तर आयसीसी क्वालिफायरमधून 10 वा संघ निवडण्यात येईल. झिंबाब्वेत सध्या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर खेळवण्यात येत आहे. यातील सुपर 6 फेरीला सुरुवात होणार आहे. या 6 मधून पहिले 2 संघ आयसीसी वर्ल्ड कप मु्ख्य सामन्यांसाठी पात्र ठरतील. तर तिसऱ्या क्रमांकावर असेलली टीम ही पाकिस्तानची जागी येईल.