पाकिस्तानने मायदेशातील कसोटी मालिकेत लाज घालवली आहे. पाकिस्तानचा बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाला आहे. बांगलादेशने ही 2 सामन्यांची कसोटी मालिका ही 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली आहे. पाकिस्तानची या पराभवामुळे चांगलीच नाचक्की झालीय. पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी फेकली गेली आहे. पाकिस्तानला यासह आणखी एक मोठा झटका लागला आहे. पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर झाली आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने 6 विकेट्सने लोळवलं.
पाकिस्तान टीम 8 महिन्यांनंतर बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेसाठी उतरली होती. पाकिस्तानचं शान मसूदच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशीप फायनलपर्यंत पोहचण्याचं लक्ष्य होतं. पाकिस्तानला त्यासाठी उर्वरित 9 पैकी 9 सामने जिंकायचे होते. मात्र बांगलादेशने पहिल्याच सामन्यात 10 विकेट्सने पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
पाकिस्तानने बांगलादेशला दोन्ही सामन्यात पराभूत केलं असतं, तर त्यांचं फायनलचं आव्हान कायम राहिलं असतं. तसंच पाकिस्तानची विजयी टक्केवारी ही 77.38 इतकी झाली असती. मात्र बांगलादेशने पाकिस्तानचा टांगा पलटी केला. त्यामुळे पाकिस्तानचा फायनलमध्ये पोहचण्याच्या आशा संपल्या. आता पाकिस्तानने उर्वरित 7 सामने जिंकले तरी त्यांना अंतिम फेरीत पोहचता येणार नाही. पाकिस्तानला आता या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीतील पुढील मालिकांमध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडिजचं आव्हान असणार आहे.
पाकिस्तान आता इंग्लंड विरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर पाकिस्तान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर मायदेशात विंडिज विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये भिडणार आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.