मुंबई : आताच पार पडलेल्या इमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेमध्ये पाकिस्तान संघाने फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव केला होता. साखळी सामन्यामध्ये टीम इंडियाने पाकिस्तान संघावर मात केली होती. मात्र फायनलमध्ये पाकिस्तान संघाने पद्धतशीरपणे अभ्यास करत विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तान अ संघाचा कर्णधार मोहम्मद हॅरिसने एक मोठा खुलासा केला आहे.
आमच्या गोलंदाजांना टीम इंडियाच्या फलंदाजांचे व्हिडीओ दाखवले. साई सुदर्शन आणि अभिषेक हे प्रमुख खेळाडू होते, त्यामुळे आम्ही त्यांचा अभ्यास केला आणि लवकरात लवकर त्यांना आऊट करत दडपण टाकण्याचा विचार केला. याचाच आम्हाला फायदा झाल्याचं मोहम्मद हॅरिस याने सांगितलं.
फायनलमध्ये मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना विरोधी संघ दडपणाखाली असतो. जर त्यांच्या सुरूवातीच्या विकेट जर आपण लवकरात लवकर मिळवल्यावर विरोधी संघ दबावामध्ये जातो. जर तुम्ही विकेट घेत राहिलात तर त्यांच्यासाठी अवघड होऊन जातं. आम्ही सर्व सामन्यांंमध्ये काही कॉम्बिनेशन करून पाहिले आणि वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली आणि याचाच आम्हाला फायदा झाल्याचंही मोहम्मह हॅरिस म्हणाला.
पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेल्या पाकिस्तान संघाने 352-8 धावांचा डोंगर उभा केला होता. पाकिस्तानच्या तैयब ताहिरने फायनल सामन्यामध्ये झंझावती शतक ठोकत महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर 224 धावांवर त्यांचा डाव आटोपला.
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज सुफियान मुकीम याने 3 विकेट घेतल्या. भारताच्या महत्त्वाच्या विकेट्स त्याने घेतल्याने संघाने विजयाच्या मार्गाने वाटचाल केली. यामध्ये अभिषेक शर्मा आणि साई सुदर्शन यांचा समावेश होता. अभिषेक शर्माने 51 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या होत्या. साई सुदर्शन 29 आणि कर्णधार यश धूल 29 धावांवर बाद झाले.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, आरएस हंगरगेकर आणि युवराजसिंह डोडिया.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.