मुंबई : ऑस्ट्रेलिया पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 14 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा संघ वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाशी कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात पाकिस्तानची पुन्हा एकदा फजिती झाल्याचं पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाचे पुन्हा तीनतेरा वाजल्याचं दिसून आलं. अनेकदा पाकिस्तानचं क्षेत्ररक्षणाची चर्चा होत असते. आता पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका चेंडूवर एक, दोन नव्हे चक्क सात धावा दिल्या. चौकार अडवून तसा काहीच फायदा झाला नाही. तर मॅथ्यू रेनशॉला अर्धशतक होण्यास मदत झाली आहे. पाकिस्तानकडून 78 वं षटक अब्रार अहमद टाकत होतं. पाचव्या चेंडूवर रेनशॉने डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू तटावला. चौकार अडवण्यासाठी मिर हमजाने धाव घेतली आणि इथून पुढे धावांसोबत हास्यजत्रा रंगली.
मिर हमजाने जीवाचा आटापीटा करत बॉण्ड्रीपर्यंत धाव घेत चौकार अडवला आणि नॉन स्ट्रायकर एण्डकडे फेकला. तिथे पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याने बॉल पकडला. यावेळी रेनशॉने आधीच तीन धावा घेतल्या होत्या. यावेळी त्याने विकेटकीपरच्या दिशेने जोरात चेंडू फेकला. पण स्टम्पवरचा नेम चुकला आणि चेंडू थेट सीमेरेषेकडे गेला. त्यामुळे रेनशॉच्या खात्यात आणखी चार धावा आल्या. त्यामुळे एकूण 7 धावांसह त्याचं अर्धशतक पूर्ण झालं.
You don't see this every day! Matthew Renshaw brings up his half-century … with a seven! #PMXIvPAK pic.twitter.com/0Fx1Va00ZE
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2023
दुसरीकडे, पाकिस्तानने 391 धावांवर 9 गडी गमवून डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाने 4 गडी गमवून 367 धावा केल्या आहेत. प्राईम मिनिस्टर संघाला अजून 24 धावा करायच्या आहेत. मॅथ्यू रेनशॉने दिवसअखेर नाबाद 136 धावांची खेळी केली. त्यामुळे आता पाकिस्तानला हा सामना जिंकणं कठीण आहे. रेनशॉकडे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. कसोटीत भविष्यात रेनशॉ त्याची जागा आरामात घेऊ शकतो. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर वॉर्नर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकणार आहे.
प्राईम मिनिस्टर इलेव्हन : कॅमरोन बॅनक्रॉफ्ट, मार्कस हरिस, मॅथ्यू रेनशॉ, कॅमरोन ग्रीन, नाथन मॅखस्वीने (कर्णधार), बिऊ वेबस्टर, जीम्मी पेरसन, नाथन मॅकअँड्र्यू, टोड मर्फी, मार्क स्टेकेटी, जॉर्डन बकिंमघम
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सऊद शकील, सरफराज अहमद, फहीम अश्रफ, अमेर जमाल, मिर हाझमा, खुर्रम शहजाद, अब्रार अहमद