मुल्तान कसोटी सामन्यातील खेळपट्टी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या खेळपट्टीवर खोऱ्याने धावा आल्या. तसेच गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. असं असूनही इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 गडी बाद 823 धावा केल्या आणि डाव घोषित केला. त्यामुळे 267 धावांची आघाडी मोडताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ 220 संघावर बाद झाला. मुल्तानच्या खेळपट्टीवर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी टीका केली होती. इतकंच काय तर या खेळपट्टीला रोड घोषित करावं असं टीकास्त्रही सोडलं होतं. असं असताना इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्सने पुढच्या दोन सामन्यासाठी खेळपट्टीवरून पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ कमबॅकसाठी प्रयत्नशील असेल. त्यामुळे पुढच्या सामन्यात वेगळी खेळपट्टी पाहायला मिळू शकते.
ख्रिस वोक्सने सांगितलं की, ‘पहिल्या सामन्यात पाटा विकेट मिळाली. आता या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात हिरवी किंवा वेगाने टर्न होणारी विकेटच मिळू शकते.’ ख्रिस वोक्सने ईएसपीएनक्रिकइंफोशी बोलताना सांगितलं की, ‘पहिल्या कसोटीपूर्वी हिरव्या रंगाच्या खेळपट्टीबाबत चर्चा झाली होती. पहिल्या दिवशी खेळपट्टीवर हिरवळ होती. त्यानंतर चांगली झाली. चेंडू पूर्णपणे त्यांच्या टप्प्यात आहे. घरच्या मैदानावर मालिका असेल आणि फक्त तीन सामने असतील आणि तुम्ही पहिला सामना हरलात. तर पुढे हिरवी किंवा टर्नर पिच असू शकते.’ पाकिस्तानकडे तितक्या दमाचे फिरकीपटू नाहीत हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे जर असा प्रयोग केला तर अंगाशी येऊ शकतो.
पाकिस्तानशी कसोटी क्रिकेटमध्ये दयनीय स्थिती आहे. घरच्या मैदानावरही सामना जिंकणं कठीण झालं आहे. पाकिस्तानने शेवटचा कसोटी सामना 1342 दिवसांपूर्वी घरीच जिंकला होता. त्यानंतर आतापर्यंत विजयासाठी आतुर आहेत. पण विजय काही मिळताना दिसत नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत कमबॅक करतील असं वाटत होतं. पण भलतंच घडलं. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं.