WTC 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून पाकिस्तान आऊट! फक्त काही तासांचा अवधी शिल्लक

| Updated on: Oct 10, 2024 | 8:51 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा काही तासातच संपुष्टात येणार आहेत. फक्त चार विकेट आणि या स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 550 हून अधिक धावा करून पराभवाच्या जवळ पोहोचला आहे.

WTC 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून पाकिस्तान आऊट! फक्त काही तासांचा अवधी शिल्लक
Image Credit source: PCB X Account
Follow us on

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. चार दिवसात या सामन्यांचं चित्र पालटलं आहे. पहिल्या दिवशी पाकिस्तानची मजबूत पकड दिसली होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी इंग्लंडने बाजी मारली. इतकंच काय तर चौथ्या दिवशी पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आणि पाकिस्तानला पराभवाच्या वेशीवर आणून उभं केलं. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 7 गडी गमवत 823 धावा केल्या आणि डाव घोषित केला. त्यामुळे इंग्लंडला 267 धावांची मजबूत आघाडी मिळाली. ही आघाडी मोडून काढतानाच पाकिस्तानचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत गेला आहे. पाकिस्तानने चौथ्या दिवसअखेर 152 धावांवर 6 गडी गमावले आहेत. अजूनही इंग्लंडकडे 115 धावांची आघाडी असून पाकिस्तानचे 4 विकेट शिल्लक आहे. पाचव्या दिवशी चार विकेट 115 धावांच्या आत पडले तर कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला जाणार आहे. इतकंच काय तर पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात येणार आहेत.

पाकिस्तानने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवला तरी गणित सुटणार नाही. गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे पराभव होताच नवव्या स्थानावर ढकलला जाईल. आतापर्यंत पाकिस्ताने 7 कसोटी सामने खेळले आहेत त्यापैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पाकिस्तानचे 16 गुण असून विजयी टक्केवारी 19.05 इतकी आहे. त्यामुळे पहिल्या दोन स्थानावर झेप घेणं आता अशक्य आहे.

पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापैकी एका सामन्याचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका संपताच वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे मुल्तान कसोटीनंतर अंतिम फेरीचं गणित संपणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडला स्लो ओव्हर रेटचा जबरदस्त फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत केलेली चूक इंग्लंडला नडली आहे. त्यामुळे विजयी टक्केवारीतून गुण कापण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचं अंतिम सामन्याचं गणित जर तरवर आहे.