मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धा ही दर चार वर्षांनी असते. त्यामुळे जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रत्येक संघ जीव तोडून मेहनत घेत असतो. आतापर्यंत वनडे वर्ल्डकप स्पर्धेचे 12 पर्व झाली आहेत आणि सध्या 13 वं पर्व सुरु आहे. यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 5 वेळा, भारताने 2 वेळा, वेस्ट इंडिजने 2 वेळा, पाकिस्तानने 1 वेळा, श्रीलंकेने 1 वेळा आणि इंग्लंडने 1 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या जेतेपदाचा मानकरी कोण? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. दुसरीकडे, जेतेपदाचं सोडून पाकिस्तानचे चाहते एका सामन्याच्या निकालावर आडून बसले आहेत. साखळी फेरीत भारताने पराभूत केल्याने पाकिस्तानी क्रीडा चाहते चांगलेच संतापले आहेत. आता आपल्या पराभवाचा सूड इतर संघांना घेण्याची विनंती सुरु झाली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी हीने बांगलादेशला सोशल मीडियावर साकडं घातलं आहे. तसेच बांगलादेशने विजय मिळवल्यास एक ऑफर देखील दिली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 नोव्हेंबरला सामना होणार आहे. भारताने साखळी फेरीतील 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशला 3 पैकी 1 सामना जिंकण्यात यश आलं आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने भारताची वाट अडवली होती हे देखील विसरून चालणार नाही.आता पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी हीने भारताला पराभूत करण्याची मागणी बांगलादेशकडे केली आहे.
सहर हीने ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढच्या सामन्यात आमचा सूड घेतील. जर त्यांची भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाली. तर मी ढाक्याला जाईल आणि बंगाली मुलांसोबत फिश डिनर डेट करेन.’ सहर हीने हे ट्वीट पाकिस्तानच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी केलं आहे. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 191 धावांवर बाद झाला होता. तर हे आव्हान भारताने 3 गडी बाद करत पूर्ण केलं होतं.
InshAllah my Bangali Bandu will avenge us in the next match. I will go to dhaka and have a fish dinner date with Bangali boy if their team managed to beat India ✌️❤️ 🇧🇩
— Sehar Shinwari (@SeharShinwari) October 15, 2023
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तानने इंग्लंडला आणि नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. दुसरीकडे, भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला तर अव्वल स्थान कायम राहील. तसेच उपांत्य फेरीची वाट आणखी सोपी होईल.