पाकिस्तानी खेळाडू स्वार्थी आहेत? फिरकीपटू आर अश्विनने सांगितलं कारण

| Updated on: Oct 04, 2024 | 9:05 PM

भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन मैदान गाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. नुकतंच त्याने बांग्लादेश कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीची जादू दाखवली. त्याचबरोबर आर अश्विन त्याच्या बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखला जातो. आता त्याने थेट पाकिस्तान संघातील उलथापालथीबाबत भाष्य केलं आहे.

पाकिस्तानी खेळाडू स्वार्थी आहेत? फिरकीपटू आर अश्विनने सांगितलं कारण
Follow us on

पाकिस्तान क्रिकेटमध्ये दिवसागणिक उलथापालथी होताना दिसत आहेत. कधी काय होईल सांगता येत नाही. कर्णधारपदासाठी तर संगीत खुर्ची सुरु आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्यात पाकिस्तानच क्रिकेटची परिस्थिती दिवसागणिक दयनीय होत चालली आहे. नुकतंच बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानला धूळ चारली होती. त्यामुळे सर्वच स्तरातून पाकिस्तान क्रिकेट संघावर टीका होत आहे. असं असताना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने पाकिस्तान संघाबाबत आपलं परखड मत मांडलं आहे. अश्विनने सांगितलं की, पाकिस्तान संघाची दया येते. आर अश्विनने आपल्या यूट्युब चॅनेलवर स्पष्टपणे सांगितलं की, ‘पाकिस्तानी संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. पण त्यांच्या संघात संगीत खूर्ची सुरु आहे. तिथे कायम कर्णधार बदलत असतात. बाबर सोडलं तर शाहीन आफ्रिदी कॅप्टन झाला. परत बाबर आझमला कॅप्टन केलं आणि आता त्याने कर्णधारपद सोडलं आहे.’

आर अश्विनने पाकिस्तान क्रिकेटबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचं रोखठोक मत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच काय तर पाकिस्तानात या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पाकिस्तानमधील पत्रकार आर अश्विनच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच अश्विनचं वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवलं होतं. पण बाबर आझमने कर्णधारपद सोडताना खेळावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं आहे. 2023 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत पाकिस्तानच्या तिन्ही फॉर्मेटसाठी बाबर आझम कर्णधार होता. निराशाजनक कामगिरीनंतर त्याने तिन्ही फॉर्मेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टी20 संघाची धुरा शाहीन अफ्रिदी, तर कसोटीची धुरा शान मसूदच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा उलथापालथ झाली.

आर अश्विनने या व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानी खेळाडूंची कानउघडणी केली आहे. खेळाडू संघाऐवजी स्वत:च हित पाहण्यात गुंतले आहेत, असा अर्थ निघतो. आर अश्विनने सांगितलं की, जर ड्रेसिंग रुममध्ये असं वातावरण असेल तर प्रत्येक खेळाडू हित पाहण्यातच गुंतेल. तो कधीच संघाच्या हिताबाबत विचार करणार नाही.