टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा टप्पा असून उपांत्य फेरीत चार संघांची वर्णी लागली आहे. दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड असा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पंचांच्या पॅनलची घोषणा आयसीसीने केली आहे. भारत इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी न्यूझीलंडचे ख्रिस गफ्फनी आणि ऑस्ट्रेलियाचे रॉडनी टकर हे मैदानाताील पंच असतील. जोएल विल्सन या सामन्यात टीव्ही पंच, तर पॉल रीफेल हे चौथे पंच असतील. तसेच न्यूझीलंडचे जेफ्री क्रो हे सामनाधिकाऱ्याच्या भूमिकेत असतील. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि भारताचे नितीन मेनन हे फिल्ड अम्पायर असतील. रिचर्ड केटलबोरो हे टीव्ही पंच, तर एहसान रझा हे चौथे पंच असतील. तर वेस्ट इंडिजच्या रिची रिचर्डसन यांना सामनाधिकाऱ्याची भूमिका दिली आहे.
दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. तर भारत आणि इंग्लंड सामन्यासाठी 4 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त वेळ असणार आहे. अंतिम फेरीचा 29 जूनला होणार असून या सामन्यासाठी पंचांची घोषणा अद्याप केलेली नाही. तर अंतिम फेरीसाठी 30 जूनचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. आता या चार संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठतो याची उत्सुकता लागून आहे. पाऊस पडून जर सामना रद्द करण्याची वेळ आली तर दक्षिण अफ्रिका आणि भारत या दोन संघांना संधी मिळेल. कारण गट 1 मधून भारताने , तर गट 2 मधून दक्षिण अफ्रिकेने टॉप केलं आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार) , मोईन अली , जोफ्रा आर्चर , जॉनी बेअरस्टो , हॅरी ब्रूक , सॅम करन , बेन डकेट , टॉम हार्टले , विल जॅक्स , ख्रिस जॉर्डन , लियाम लिव्हिंगस्टोन , आदिल रशीद , फिलिप सॉल्ट , रीस टोपले , मार्क वुड.