बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसं काढली. त्यामुळे चौथ्या दिवशी नितीश कुमार रेड्डी पुन्हा एकदा सिराज सोबत मैदानात उतरला. शेवटची विकेट असल्याने ऑस्ट्रेलियाचा त्याला बाद करण्याचा पूर्ण प्लान होता. पण पंचांच्या एका निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स चांगलाच भडकला. भारताचा पहिला डाव चौथ्या दिवशी झटपट आटोपण्यासाठी पॅट कमिन्सने मोहम्मद सिराजला 119 व्या षटकात फुल लेंथ चेंडू टाकला. बॅटचा कोपरा घासून चेंडू दुसऱ्या स्लिपला असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे गेला. स्टीव्ह स्मिथने कोणतीही चूक न करता सहज झेल पकडला. यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा करणअयास सुरुवात केली.
फिल्ड पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला. ऑस्ट्रेलियन टीम विकेट मिळाल्याचं पाहून पॅव्हेलियनकडे कूच करत होता. पण तिसरे पंच शरफुद्दौलाने हा नाबाद असल्याचे सांगितलं. इतकंच काय नाबाद असल्याचं कारण देत सांगितलं की, ‘मी चेंडू मागून लागल्यानंतर पाहू शकतो. मी संतुष्ट आहे.’ या निर्णयामुळे कमिन्स आणि ऑस्ट्रेलियन संघ चाचपडला. पॅट कमिन्सने डीआरएसची मागणी करत मैदानी पंचांकडे पुन्हा रिव्ह्यू बघणअयाचा आग्रह केला. पण फिल्ड पंचांनी पॅट कमिन्सची ही मागणी झिडकारून लावली.
— The Game Changer (@TheGame_26) December 29, 2024
तिसऱ्या पंचांच्या या निर्णयामुले माजी क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्ट आणि रवि शास्त्री यानाही आश्चर्याचा धक्का बसला. या वादग्रस्त निर्णयाचा ऑस्ट्रेलियाला फार काही फटका बसला नाही. नाथन लियॉनने शतकवीर नितीश रेड्डीला 114 धावांवर बाद केले. भारताचा डाव 119.3 षटकात 369 धावांवर आटोपला. तसेच ऑस्ट्रेलियाला 105 धावांची आघाडी मिळाली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात आघाडीच्या धावा पकडून 300 धावांचा पल्ला ओलांडला आहे. त्यामुळे भारतापुढे पाचव्या दिवशी मोठं आव्हान आहे. एक तर सामना ड्रॉ करावा लागेल किंवा जिंकण्यासाठी पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळावं लागणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने या मालिकेत फार काही चांगलं केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.