मुंबई | मेन्स क्रिकेट टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्ध कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाने पहिला कसोटी सामना जिंकून विंडिज दौऱ्याची विजयी सुरुवात केली. तर आता दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. मात्र या दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या एका खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
पॉल वॉल्थॅटी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. पॉल खऱ्या अर्थाने आयपीएल 2011 मध्ये चमकला. पॉलने तेव्हाच्या पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हनकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शतक ठोकलं होतं. मात्र पॉलला त्यानंतर ना सातत्याने संधी मिळाली ना त्याला टीम इंडियाकडून खेळवण्याबाबत विचार करण्यात आला. त्यामुळे शतकामुळे चर्चेत आलेला पॉल हा फार काळ चर्चेत राहू शकला नाही. पॉलने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पॉलने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनला निवृत्तीबाबतची माहिती दिली.
पॉलचा क्रिकेटला रामराम
Paul Valthaty has announced his retirement from first class cricket. pic.twitter.com/bpx6i95MyO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 17, 2023
पॉलने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 23 एप्रिल 2009 मध्ये आयपीएल पदार्पण केलं होतं. पॉलने आपल्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 23 सामन्यात 120.81 च्या स्ट्राईक रेट आणि 22.95 च्या सरासरीने 505 धावा केल्या. या दरम्यान पॉलने 1 खणखणी शतक आणि 2 अर्धशतकं ठोकली आहेत. पॉलने आपला अखेरचा आयपीएल सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 19 एप्रिल 2013 रोजी खेळला होता. तसेच पॉलने 5 फर्स्ट क्लास, 4 लिस्ट ए आणि 34 टी 20 सामने खेळले आहेत. इतर खेळाडूंच्या तुलनेत पॉलला फार संधी मिळाली नाही. त्यामुळे भारत एक प्रतिभावान खेळाडूला मुकला.
पॉल वॉल्थाटीने निवृत्तीनंतर सहकाऱ्यांचे, बीसीसीआयचे आणि एमसीएचे आभार मानले आहेत. “मला क्रिकेट कारकीर्दीत चॅलेंजर ट्रॉफी इंडिया ब्लू,इंडिया अंडर 19 आणि मुंबई सीनिअर टीमकडून खेळण्याची संधी दिली यासाठी मी बीसीसीआय आणि एमसीएचा आभारी आहे”, अशा शब्दात पॉलने कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान पॉल पार्थिव पटेल आणि इरफान पठाण यांच्यासह 2002 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप खेळला होता. मात्र पॉलला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात डोळ्याला दुखापत झाली. त्यामुळे पॉलला क्रिकेटपासून जवळपास 4 वर्ष दूर राहावं लागलं होतं.