मुंबई | आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा पार पडली. ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. तर टीम इंडियाची प्रतिक्षा पुन्हा वाढली. टीम इंडियाला पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 20 वर्षांनी उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र या स्पर्धेनंतर आगामी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी 8 संघ निश्चित झाले. वनडे वर्ल्ड कप 2023 पॉइंट्स टेबलमधील पहिले 8 संघ हे चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी पात्र ठरले. या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ट्रॉफी स्पर्धेत एकूण 8 संघ भिडणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाच मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील ताणल्या गेलेल्या संबंधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उभयसंघात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेतच खेळतात.
आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची बैठक पुढील आठवड्यात पार पडणार आहे. या बैठकीत पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी, बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतर देशातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर नकवी जय शाह यांच्यासोबत चॅम्पियन ट्ऱॉफीबाबत चर्चा करणार आहे. जय शाह होकार देतील, अशी आशा नकवी यांना आहे. मात्र याबाबत कोणतीही शक्यता नाही.
पाकिस्तानकडून सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी बरेच व्यवहार बंद केले आहेत. तसेच पाकिस्तानच्या खेळाडूंना आयसीसी स्पर्धेशिवाय भारतात प्रवेशही नाही. मात्र टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामने होतात. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना कायम या सामन्याची प्रतिक्षा असते. एका बाजूला सुरक्षेचा प्रश्न म्हणून बीसीसीआय आपल्या खेळाडूंना पाकिस्तानला पाठवत नाही. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला भारतात प्रवेश नाही.
पाकिस्तानला बीसीसीआयकडून होकाराची आशा
New PCB Chairman wants the BCCI to confirm their participation in 2025 Champions Trophy in Pakistan. (TOI). pic.twitter.com/M6GUsgwVSj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 11, 2024
आता आयसीसी स्पर्धा आहे म्हटल्यावर टीम इंडियाला नियमानुसार पाकिस्तानला जावं लागेल. मात्र आता बीसीसीआय टीम इंडियाबाबत काय निर्णय घेते, हे ही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तसेच जर गत आशिया कप स्पर्धेनुसार आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचं हायब्रिड मॉडेलनुसार आयोजन केल्यास दोन्ही संघांचे सामनेही होतील आणि कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
दरम्यान टीम इंडियासह, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिनस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या 8 संघांनी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी क्वालिफाय केलं आहे.