कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात भारतीय क्रीडारसिकांचं स्वप्न पूर्ण झालं. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे आता टीम इंडिया, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांचं कौतुक होत आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सौरव गांगुलीच्या नावाचा विसर पडल्याचं दिसून येत आहे. कारण रोहित शर्माला कर्णधार आणि राहुल द्रविडला प्रशिक्षकपदी बसविण्याचं काम माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलं होतं. युएई 2021 वर्ल्डकप स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्याच्या जागी रोहित शर्माला नेतृत्व सोपवण्याची कामगिरी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बजावली होती. बांगला न्यूजपेपर आजकालशी बोलताना सौरव गांगुलीने सांगितलं की, “मी जेव्हा रोहितकडे कर्णधारपद सोपवलं तेव्हा माझ्यावर टीका झाली. आता आम्ही त्याच्याच नेतृत्वात चषकावर नाव कोरलं आहे. आता कोणीच मला शिवीगाळ करत नाही. प्रत्येकजण विसरले आहेत की मी त्याला कर्णधार केलं होतं.”
विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तेव्हा सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष होता. टी20 फॉर्मेटमध्ये भारताचं कर्णधारपद भूषवलेल्या रोहित शर्माने नोव्हेंबरमध्ये कर्णधारपद स्वीकारलं होतं. पहिल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वात अपयश आलं होतं. इंग्लंडने उपांत्य फेरीत पराभूत केलं होतं. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पराभवाची नामुष्की ओढावली होती. दोन्ही स्पर्धेत ऑस्ट्रेलिया वरचढ ठरली होती.
रोहित शर्माच्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहे. या दोन्ही स्पर्धा पुढच्या वर्षी असून यासाठी सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत टीम इंडिया सध्यातरी पहिल्या स्थानावर आहे. पण गुणतालिकेत काहीही होऊ शकतं. भारताच्या अजूनतरी तीन कसोटी मालिका शिल्लक आहेत. त्यामुळे भारतासमोर मोठं आव्हान आहे. बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्यांची, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निर्णायक ठरणार आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियात होणार असून भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांचा कस लागेल.