मुंबई : प्रत्येक खेळामध्ये आपल्याला खेळाडूंचा जोश पाहायला मिळतो. स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक जण जीवाची बाजी लावतो, असं म्हणायला हरकत नाही. आत्मविश्वास दांडगा असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते. असाच काहीसा प्रकार क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाला. 83 वर्षांचा खेळाडू पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर बांधून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. स्कॉटलँडमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवलेल्या माजी क्रिकेटपटू एलेक्स स्टील यांच्या हिमतीला दाद दिली जात आहे. त्यांनी 83 वय हा निव्वल आकडा असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असूनही मैदानात उतरले.
83 वर्षीय एलेक्स स्टील पाठीवर सिलेंडर बांधून मैदानात उतरले. इतकंच काय तर त्यांनी विकेटकीपिंग केली. एलेक्स यांना इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा आजार आहे. हा आजार श्वसनासंबंधी आहे. या आजारामुळे अचानक शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते आणि श्वास घेण्यास अडचण येते. एलेक्स यांना 2020 पासून हा आजार आहे. पण इतकं असूनही ते क्रिकेट खेळण्यासाठी सदैव सज्ज असतात.
क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करणं एक कठीण टास्क मानला जातो. विकेटच्या पाठी गोलंदाज टाकत असलेल्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवून कामगिरी बजवावी लागते. असं असूनही एलेक्स स्टील ही जबाबदारी चोखपणे बजावतात.
एलेक्स स्टील यांनी फर्स्ट क्लास डेब्यू 1967 साली केलं होतं. त्याने 14 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 24.48 च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह 621 धावा केल्याआहेत. विकेटकीपर फलंदाज म्हणून 1968 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांचा 97 धावा केल्या होत्या. इतकंच काय तर विकेटकीपिंग करताना एलेक्सने 11 झेल आणि 2 स्टंपिंग घेतले आहेत.