प्रतिका रावलचं चौथ्या वनडेत दुसरं अर्धशतक, सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाली…

| Updated on: Jan 10, 2025 | 10:33 PM

भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडला नमवलं. या सामन्यात विजयाची शिल्पकार ठरली ती प्रतिका रावल.. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिका रावलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रतिका रावलचं चौथ्या वनडेत दुसरं अर्धशतक, सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाली...
Image Credit source: BCCI
Follow us on

भारत आणि आयर्लंड वुमन्स वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. हा सामना भारताने 6 विकेट आणि 93 चेंडू राखून जिंकला. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच 50 षटकात 7 गडी गमवून 238 धावा केल्या. विजयासाठी 239 धावांचं आव्हान मिळाल्यानंतर कर्णधार स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 70 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना बाद झाल्यानंतरही प्रतिका रावलने आपली खेळी सुरुच ठेवली. प्रतिकाने 96 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 89 धावांची खेळी केली. तिचं शतक 11 धावांनी हुकलं. 92.71 च्या स्ट्राईक रेटने तिने 89 धावा केल्या. प्रतिकाला या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रतिका रावल म्हणाली की, ‘मी येथे आरामात खेळत आहे. स्मृती खूप मदत करते, नेहमी तिला दुसऱ्या बाजूने खेळताना पाहण्याचा आनंद घेते. तिची खेळी पाहून पाय जमिनीवर येतात. मानसशास्त्राची विद्यार्थी असल्यानेही शांत राहण्यास मदत होते. आम्ही सर्व काही साधं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, आमची सुरुवात चांगली झाली होती. आम्हाला फक्त गती कायम ठेवायची होती. शेवटी तेजलनेही खूप छान खेळ केला. खरे तर आम्ही सगळे चांगले खेळलो. मी निकालांबद्दल विचार करत नाही, मोठ्या आकड्यांचा विचार करत नाही, फक्त एका वेळी एक सामना समोर ठेवते. जेव्हा जेव्हा चेंडू माझ्या स्लॉटमध्ये असतो तेव्हा मी चौकार मारण्याचा प्रयत्न करते. नाहीतर मी फक्त जमिनीवर ढकलण्याचा प्रयत्न करते.’

प्रतिकाचं हे दुसरं अर्धशतक आहे. प्रतिका आतापर्यंत चार वनडे सामने खेळली असून दोन अर्धशतकांसह 223 धावा केल्या आहेत. दरम्यान, भारत आयर्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना मालिकेचा निकाल ठरवणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर मालिका खिशात येईल. अन्यता आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागेल. भारताचा दुसरा सामना 12 जानेवारी, तर तिसरा सामना 15 जानेवारीला होणार आहे.