PSL Final 2023 | मुल्तान सुल्तान टीमवर 1 रनने सनसनाटी विजय, लाहोर कलंदर्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन

| Updated on: Mar 19, 2023 | 12:58 AM

पाकिस्तान सुपर लीग 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तान टीमवर शेवटच्या बॉलवर 1 धावेने थरारक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची कामगिरी केली आहे.

PSL Final 2023 | मुल्तान सुल्तान टीमवर 1 रनने सनसनाटी विजय, लाहोर कलंदर्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन
Follow us on

लाहोर | अत्यंत थरारक आणि रंगतदार झालेल्या पीएसल 2023 च्या अंतिम सामन्यात लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तानवर शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवला आहे. या विजयासह लोहोर सलग दुसऱ्यांदा पीएसएल चॅम्पियन ठरली आहे. मुल्तान सुल्तानला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 धावांचा गरज होती. मुल्तानकडून फलंदाजाने शेवटच्या बॉलवर फटका मारला. त्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरी धाव पूर्ण करणार त्यातच खुशदील शाह याला रनआऊट केलं आणि लाहोरने ही ट्रॉफी जिंकली. लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तानला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 201 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुल्तान सुल्तानला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हर्समध्ये 199 धावाच करता आल्या.

असा रंगला शेवटच्या ओव्हरचा थरार

मुल्तान सुल्तानला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज होती. लाहोर कलंदर्सचा कॅप्टन शाहिन शाह आफ्रिदी याने विश्वासाने झमान खान याला शेवटची आणि निर्णायक ओव्हर दिली. मैदानात अब्बास आफ्रिदी आणि खुशदिल शाह बॅटिंग करत होते.अब्बासने फटका मारत पहिल्या बॉलवर 2 धावा घेतल्या. दुसऱ्या बॉलवर अब्बासने एक धाव घेत स्ट्राईक बदलली. तिसरा बॉल खुशदिलने डॉट केला.

शेवटची रंगतदार ओव्हर

चौथ्या बॉलवर जिथे एकही रन होत नव्हती तिथे ओव्हर थ्रो करुन लाहोरने मुल्तानला 2 धावा दिल्या. आता 2 बॉलमध्ये गरज होती 8 धावांची. खुशदीलने पाचव्या बॉलवर चौकार मारला. त्यामुळे शेवटच्या बॉलवर विजयासाठी 4 आणि सुपर ओव्हरसाठी 3 धावांची गरज होती. चाहत्यांची आणि दोन्ही संघांची धाकधूक वाढलेली. झमानने शेवटचा बॉल टाकला.खुशदीलने या बॉलवर 2 रन्स धावून घेतल्या. तिसरी रन घेणार तेवढ्या खुशदिल शाह याला नॉन स्ट्राईक एंडवर रनआऊट करत लाहोर कलंदर्सने दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची कामगिरी केली.

मुल्तानची बॅटिंग

मुल्तानकडून रिली रोसो याने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. कॅप्टन मोहम्मद रिझवान याने 34 रन्स केल्या. खुशदील शाह याने 25 धावांची खेळी करत चांगली झुंज दिली. टीम डेव्हिड 20 धावांवर आऊट झाला. कायरन पोलार्ड 19 रन्स करुन तंबूत परतला. तर सलामवीर उस्मान खान याने 18 रन्स केल्या. अब्बास आफ्रिदी 17 धावांवर नाबाद राहिला. अनवर अली याने निराशा केली. त्याने 1 धाव केली. तर उस्मा मीर भोपळही फोडू शकला नाही.

लाहोरकडून कॅप्टन शाहिन आफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. राशिद खान याने 2 फलंदाजांना आऊट केलं. तर डेव्हिड विस याने 1 विकेट घेतली.

लाहोरची बॅटिंग

त्याआधी लाहोरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. लाहोरने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. लाहोरकडून अब्दुल्ला शफीक याने 65 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन शाहिन आफ्रिदी याने 15 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावा कुटल्या. फखर जमान याने 39 तर मिर्जा बेग याने 30 धावा केल्या. या चौघांशिवाय इतरांना काही विशेष काही करता आलं नाही. मुल्तान सुल्तानकडून उस्मा मीर याने 3 विकेट्स घेतल्या. तर अन्वर अली, इहसानुल्लाह आणि खुशदिल या तिकडीने 1-1 विकेट घेतली.

लाहोर कलंदर्स सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन

लाहोर कलंदर्स प्लेइंग इलेव्हन | शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), मिर्झा ताहिर बेग, फखर जमान, अब्दुल्ला शफीक, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), अहसान भाटी, सिकंदर रझा, डेव्हिड विस, रशीद खान, हरिस रौफ, जमान खान

मुल्तान सुल्तान प्लेइंग इलेव्हन | मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), उस्मान खान, रिली रोसो, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, खुशदिल शाह, अन्वर अली, उसामा मीर, अब्बास आफ्रिदी, शेल्डन कॉट्रेल आणि इहसानुल्लाह.