मुंबई | भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चं वेळापत्रक मंगळवारी 27 मे रोजी जाहीर करण्यात आलं. वनडे वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. एकूण 46 दिवस वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा आणि अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. देशातील 12 शहरांमध्ये एकूण 48 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने , अहमदाबाद, धर्मशाळा, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरु, मुंबई आणि कोलकाता येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर हैदराबाद, गुवाहाटी आणि तिरुवनंतरपूरम इथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवण्यात येणार आहेत.
वर्ल्ड कप स्पर्धेत यंदा अनेक शहरांमध्ये सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं नाही. नागपूर, मोहाली, तिरुवनंतरपूरम या आणि अन्य शहरांमध्ये सामन्यांचं आयोजन न केल्याने स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिरुवनंतरपूरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर आणि विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. थरुर आणि देशमुख यांनी ट्विट करत आपल्या शहरात वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन न केल्याने नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर आता पंजाबचे क्रीडा मंत्री गुरुमीत सिंह मीत हेयर यांनीही नाराजीचा सूर आवळला आहे. सिंह यांनी बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांना पत्राद्वारे खोचक प्रश्न विचारले आहेत. “आयसीसीच्या कोणत्या नियमांनुसार मोहालीत वर्ल्ड कप सामन्याचं आयोजन करण्यात आलं नाही?” असा आक्रमक सवाल सिंह यांनी बीसीसाआयला केला आहे.
“वर्ल्ड कप मॅच वेन्यूसाठी स्टेडियमची पाहणी करण्यात आली होती का? आयसीसीचे कोणते अधिकारी मोहाली स्टेडियमची पाहणी करायला आले होते?”, असे प्रश्नही सिंह यांनी यानिमित्ताने उपस्थित केले. तसेच सिंह यांनी याआधी आपला राग व्यक्त केलाय. वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर होताच सिंह यांनी प्रतिक्रिया दिली होती. “मोहाली क्रिकेट स्टेडियम 1996 आणि 2011 मधील प्रमुख सामन्यांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र यंदा एकाही सामन्यांचं आयोजन करण्याची संधी मिळाली नाही”, असं सिंह यांनी म्हटलं.
तसेच सिंह यांनी सामन्यांच्या आयोजनावरुन राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केलाय. “सर्वांना माहितीय की बीसीसीआयमध्ये कारभार कोणाच्या नेतृत्वात सुरुय”, असं म्हणत सिंह यांनी अप्रत्यक्ष जय शाह यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिरुवनंतपूरम, नागपूर, मोहाली, इंदूर, राजकोट आणि रांची या शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं नाही.