‘तुम्ही लोकं माझा जीव घ्याल…’ पत्रकाराच्या त्या प्रश्नावर कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उत्तर

| Updated on: Dec 18, 2024 | 4:13 PM

गाब्बा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्याच्यासोबत निवृत्ती जाहीर केलेला आर अश्विनही होता. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा एका प्रश्नाचं उत्तर देताना रोहित शर्मा थेट म्हणाला की माझा जीव घ्यायचा आहे का? रोहित शर्मा असं का म्हणाला ते जाणून घेऊयात

तुम्ही लोकं माझा जीव घ्याल... पत्रकाराच्या त्या प्रश्नावर कर्णधार रोहित शर्माने दिलं असं उत्तर
Follow us on

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिकेतील तिसरा ड्रॉ झाल्याने मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आता उर्वरित दोन सामन्यात कोण सरशी घेते याकडे लक्ष लागून आहे. या दोन सामन्यांवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीबाबत काय ते स्पष्ट होणार आहे. असं असताना भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत क्रीडाप्रेमींना धक्का दिला. गाब्बा कसोटी सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत आर अश्विन पत्रकार परिषदेत दिसला. यावेळी आर अश्विनच्या निवृत्तीबाबत पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. या सर्व प्रश्नांना रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनी उत्तरं दिली. पण एका प्रश्नामुळे रोहित शर्माही संभ्रमात पडला. कारण या प्रश्नाचं उत्तर रोहित शर्मासाठी बाउंसर ठरले असते. यावेळी पत्रकाराने आर अश्विनच्या निवृत्तीचा धागा पकडत रोहित शर्माला प्रश्न विचारला. आर अश्विन, पुजारा आणि रहाणे दुसऱ्या भूमिकेत दिसणार का? यावर रोहित शर्माने सांगितलं की, तुम्हाला माझा जीव घ्यायचा आहे का? असं रोहित शर्मा का म्हणाला ते जाणून घ्या.

अश्विन, पुजारा आणि रहाणे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित शर्मा म्हणाला का, ‘अरे भावा, फक्त अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. तुम्ही लोकं माझा जीव घ्याल. रहाणे आणि पुजारा दोघेही अजून खेळत आहेत. चांगलं खेळणार तर टीममध्ये येऊ शकतात.’ रोहित शर्माच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेतील प्रत्येक जण हसू लागला. त्यानंतर रोहित शर्माला आणखी एक प्रश्न विचारला गेला. या दौऱ्यात आणखी काही सरप्राइज मिळू शकते का? त्यावर भारतीय कर्णधाराने सांगितलं की, आता नाही. सध्यातरी असं काहीच नाही.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत भारतीय संघ स्थान मिळवण्यास अपयशी ठरला तर विराट आणि रोहित निवृत्त होतील, अशी चर्चा आहे. दोन्ही खेळाडू सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. आता मेलबर्न आणि सिडनी काय होतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहेत. टीम इंडियाकडे अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. त्यामुळे पुढच्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवणं अपेक्षित आहे. या दोन सामन्यानंतर भारताचं अंतिम फेरीचं काय ते कळणार आहे.