अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने गेल्या हंगामात रणजी ट्रॉफी जिंकली. त्यानंतर नुकतच इराणी कपवर नाव कोरलं. त्यामुळे मुंबई रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात ही विजयाने करेल, अशीच आशा होती. मात्र बडोदाने गतविजेत्या मुंबईचा धुव्वा उडवत पराभूत केलं. आता मुंबई दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र विरुद्ध खेळत आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतील शरद पवार क्रिकेट एकेडमी, बीकेसी येथे करण्यात आलं आहे. या सामन्यात मुंबईच्या आयुष म्हात्रे या 17 वर्षीय युवा फलंदाजाने खणखणीत शतक ठोकलंय. आयुषने 133 बॉलमध्ये 14 चौकार आणि 2 षटकार ठोकले. आयुषच्या फर्स्ट क्लास कारकीर्दीतील हे पहिलवहिलं शतक ठरलंय. आयुषने या शतकी खेळीदरम्यान कॅप्टन अजिंक्य रहाणेसह भागीदारी केली. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर नाबाद परतला.
महाराष्ट्रने टॉस जिंकला, कॅप्टन ऋतुराज गायकवाडने फिल्डिंगचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय मुंबईच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. मुंबईने महाराष्ट्राला 31.4 ओव्हरमध्ये 126 रन्सवर गुंडाळलं. महाराष्ट्रसाठी अझीम काझी याने नाबाद 36 आणि निखील नाईकने 38 धावांचं सर्वाधिक योगदान दिलं. सिद्देश वीर याने 11 आणि अंकीत बावणे याने 17 धावा केल्या. तर अर्शीन कुलकर्णी याने 14 धावा केल्या. कॅप्टन ऋतुराजसह, सचिन धस, हितेश वाळुंज आणि राजवर्धन हंगरगेकर या चौघांना भोपळाही फोडता आला नाही. तर सत्यजीत बच्छाव याने 8 आणि प्रदीप दढेने 1 धाव केली. मुंबईकडून शम्स मुलानी आणि मोहित अवस्थी या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर आणि रॉयस्टन डायस या जोडीने 2-2 विकेट्स घेतल्या.
मुंबईची सुरुवात काही खास राहिली नाही. पृथ्वी शॉ 1 आणि हार्दिक तामोरे 4 वर आऊट झाल्याने मुंबईची 2 बाद 24 स्थिती झाली. त्यानंतर आयुष आणि कॅप्टन रहाणे या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 99 धावा जोडल्या. त्यानंतर रहाणे 64 बॉलमध्ये 31 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आला. श्रेयस आणि आयुष हे दोघे खेळ संपेपर्यंत टिकून राहिले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी स्टंप डे होईपर्यंत नॉट आऊट 97 धावांची भागीदारी केली आहे. मुंबईने 49 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावा केल्या असून 94 ची आघाडी घेतली आहे. आयुष म्हात्रे 163 बॉलमध्ये 17 फोर आणि 3 सिक्ससह 127 वर नॉट आऊट आहे. तर श्रेयसने नाबाद 45 धावा केल्या आहेत. महाराष्ट्रकडून प्रदीप दढे याने दोघांना बाद केलं. तर हितेश वाळुंजला 1 विकेट मिळाली.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शम्स मुलाणी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि रॉयस्टन डायस.
महाराष्ट्र प्लेइंग ईलेव्हन : रुतुराज गायकवाड (कॅप्टन), अर्शीन कुलकर्णी, अंकित बावणे, निखिल नाईक (विकेटकीपर), सचिन धस, अझीम काझी, सत्यजीत बच्छाव, सिद्धेश वीर, राजवर्धन हंगरगेकर, प्रदीप दढे आणि हितेश वाळूंज.