मुंबई | टीम इंडियाला इंग्लंडकडून पहिल्या कसोटी सामन्यात 190 धावांच्या आघाडीनंतरही 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर टीम इंडियाचा मार्च 2023 नंतर मायदेशातील सलग तिसरा कसोटी पराभव ठरला. टीम इंडियाला या पराभवानंतर आणखी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचे 2 दिग्गज खेळाडू हे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोघे दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे या दोघांना दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडावं लागलं आहे. जडेजाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी हाताला दुखापत झाली होती. तर केएल राहुल याला उजव्या मांडीत त्रास असल्याची तक्रार आहे. त्यामुळे केएल राहुल हा देखील दुसऱ्या सामन्यात नसणार आहे. बीसीसीआयची मेडीकल टीम या दोघांवर करडी नजर ठेवून आहे.
केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांच्या जागी टीममध्ये 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआय निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आलेली आहे. वॉशिंग्टन याला टीम इंडियात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संधी दिली. त्यामुळे आता इंडिया ए टीममध्ये इंग्लंड लायन्स विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी वॉशिंग्टनच्या जागी सारांश जैन याचा समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का
NEWS 🚨 – Ravindra Jadeja & KL Rahul ruled out of the second Test.
More details on the replacements here –https://t.co/nK9WjnEoRc #INDvENG
— BCCI (@BCCI) January 29, 2024
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.