मुंबई : चेन्नई (CSK)सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) बुधवारी बरगडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या (IPL 2022) उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला. CSK ने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. स्वत: जडेजानं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर दुखापतीबाबत कोणतंही वक्तव्य दिलेलं नाही. तेव्हापासून फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यातील वादाबद्दल अनेक अटकळ बांधली जात आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानं आता या प्रकरणी मोठं वक्तव्य केलं असून पडद्यामागे काय चाललंय, ते सांगितलंय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापूर्वी आकाश चोप्रा म्हणाला की, मला वाटतं जडेजा पुढील वर्षी सीएसकेकडून खेळणार नाही. चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की चेन्नईसाठीच्या शेवटच्या सामन्यात मी म्हणालो की जडेजा सामना खेळणार नाही आणि मला वाटते की तो पुढील वर्षीही या संघासोबत नसेल. सुरेश रैनाचं उदाहरण देताना तो म्हणाला की, फ्रँचायझी अचानक खेळाडूंशी संबंध तोडतात आणि हे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे.
आकाश चोप्रा पुढे बोलताना म्हणाला की, ‘सीएसके कॅम्पमध्ये असं बरंच घडतं की दुखापतींबद्दल स्पष्टता नसते आणि नंतर एखादा खेळाडू सामना खेळत नाही. मला आठवतं की सुरेश रैना 2021 मध्ये काही काळ खेळला आणि त्यानंतर गोष्टी संपल्या. त्यांना फक्त टाटा म्हणतात. त्यामुळे मला माहित नाही की जद्दूचे काय प्रकरण आहे. परंतु त्याची अनुपस्थिती सीएसकेसाठी समस्या असेल. CSK ने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जडेजाच्या दुखापतीच्या बातम्यांचा उल्लेखही केला होता. फ्रँचायझीने आल्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिलंय कीजडेजा दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही. आमच्या जादूगाराला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा,’
मीडिया रिपोर्ट्सनुसार, CSK च्या इंस्टाग्राम हँडलने रवींद्र जडेजाला अनफॉलो केले आहे. तेव्हापासून जडेजाच्या CSK सोबतच्या मतभेदाच्या बातम्यांनी सोशल मीडियावरही खूप लक्ष वेधलं आहे. IPL 2022 मध्ये CSK चा जडेजा सर्वात महागडा खेळाडू आहे. फ्रँचायझीने त्याला 16 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं होतं. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर त्याची संघाच्या कर्णधारपदी नियुक्तीही करण्यात आली होती. टूर्नामेंट सुरू झाल्यानंतर, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आठपैकी सहा सामने गमावले. या काळात जडेजाचा फॉर्मही खराब होता. त्याला नऊ सामन्यांत केवळ 111 धावा करता आल्या आणि तीन विकेटही घेतल्या. खराब कामगिरीनंतर जडेजाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता आणि एमएस धोनीला पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. गुरुवारी चेन्नईला मुंबईविरुद्ध सामना खेळायचा आहे.