मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. एक दोन विजयांमुळे गुणतालिकेचं पूर्ण गणित बदलत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्लीला 23 धावांनी पराभूत करत पुन्हा कमबॅक केलं आहे. तर सलग पाच पराभवामुळे दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. पण दिल्लीचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 151 धावा करू शकला.
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स 6 गुण आणि +1.588 गुणांसह पहिल्या स्थानावर, लखनऊ 6 गुण आणि +1.048 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, गुजरात 6 गुण आणि +0.341 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
कोलकाता, चेन्नई, पंजाब, बंगळुरु आणि हैदराबाद हे संघ प्रत्येकी 4 गुणांसह अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या स्थानावर आहेत. मुंबई दोन गुणांसह नवव्या स्थानावर आहे. दिल्ली शून्य गुणांसह तळाशी आहे.
सलग पाच पराभवामुळे दिल्लीला कमबॅक करणं आता कठीण आहे. म्हणजेच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असंच म्हणावं लागेल. दिल्लीसाठी पुढची सर्व गणितं आता जर तरची असतील. दिल्लीला अजून 9 सामने खेळायचे आहेत.
बंगळुरुने दिलेल्या 175 या धावांचा आकडा गाठताना दिल्लीची फलंदाजी सुरुवातीला अडखळली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरलेला पृथ्वी शॉ स्वस्तात धावचीत झाला. त्यानंतर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर मिशेल मार्श आला आणि 4 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. तो तंबूत परतत नाही तोच यश धुल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत होत बाद झाला. त्याने 4 चेंडूत अवघी एक धाव केली.
संघावर दडपण असताना डेविड वॉर्नर डाव सावरेल असं वाटत होतं. पण तोही काही खास करू शकला नाही. 13 चेंडूत 19 धावा करून विशाक विजयकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला.
अभिषेक पोरेलकडून अपेक्षा होत्या मात्र त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. तोही 8 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेल आणि मनिष पांडे जोडी जमली. ही जोडी फोडण्यात विशाक विजयकुमारला यश आलं.
अक्षर पटेल 14 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर मनिष पांडेनं आक्रमक खेळी सुरु ठेवली. अर्धशतक ठोकल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर पायचीत झाला.
ललित यादवच्या रुपाने दिल्लीला आठवा धक्का बसला. विशाकच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेलनं त्याचा झेल घेतला. त्याला अवघ्या चार धावा करता आल्या. अमन खानही काही खास करू शकला नाही. 10 चेंडूत 18 धाव करून बाद झाला.