मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील पहिल्या मोसमातील पहिला डबल हेडर सामन्याचं आयोजन हे आज 5 मार्च रोजी करण्यात आलंय. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 60 धावांनी पराभव करत विजयी सुरुवात केली. दिल्लीने या पहिल्यावहिल्या विजयासह मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली. यामध्ये ओपनर बॅट्समन शफाली वर्मा आणि कॅप्टन मेग लॅनिंग या दोघांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं. शफालीने 84 तर मेगने 72 धावांचं योगदान दिलं. तर यानंतर दिल्लीची बॉलर तारा नॉरिस ही स्पर्धेत 5 विकेट्स घेणारी पहिली बॉलर ठरली.
आरसीबीने टॉस जिंकत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दिल्लीची ओपनिंग जोडी शफाली आणि मेग या दोघींनी 162 धावांची सलामी भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 223 धावा उभारल्या. ही स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर महिला टी 20 स्पर्धेतील इतिहासातील दुसरा सर्वोच्च स्कोअर ठरला.
आरसीबी 224 धावांचं पाठलाग करायला मैदानात आली. मात्र आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 163 धावाच करता आल्या. आरसीबीकडून कॅप्टन स्मृती मंधाना हीने 35, अष्टपैलू हीथर नाईट हीने 34 आणि एलिस पॅरीने 31 धावांचं योगदान दिलं. तर मेगन शेटने नाबाद 30 धावा केल्या.
दुसऱ्या बाजूला दिल्लीकडून तारा नॉरिस हिने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. ताराने यासह स्पर्धेत पहिल्यांदा 5 विकेट्स घेण्याचा बहुमान मिळवला. ताराने 4 ओव्हरमध्ये 29 धावांच्या मोबदल्यात 5 फलंदाजांचा काटा काढला.
दिल्लीने आरसीबीने ठराविक अंतराने धक्के दिले. मात्र आरसीबीकडून नाईट आणि मेगान शट या जोडीने 8 व्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये 54 धावांची भागीदारी केली. त्यामुळे विजयातील अंतर कमी झालं, अन्यथा चित्र काही दुसरंच असतं.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | मॅग लँनिंग (कर्णधार) शफाली वर्मा, मारिजाने कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव आणि तारा नॉरिस.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन | स्मृति मंधना (कॅप्टन), सोफी डिवाइन, दिशा कसट, एलिस पॅरी, रिचा घोष, हेदर नाइट, कनिका आहूजा, आशा शोभना, मेगन शूट, प्रीति बोस आणि रेणुका सिंह.