भारतीय टी20 संघाची धुरा 33 वर्षीय सूर्यकुमार यादव याच्या हाती सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आली आहे. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत सूर्यकुमार यादव याच्या हाती ही धुरा असेल असं सांगण्यात येत आहे. हार्दिक पांड्या या शर्यतीत आघाडीवर असताना कर्णधारपदाची माळ सूर्यकुमार यादवच्या गळ्यात पडली. पांड्याची दुखापत पाहता हा निर्णय घेतल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पहिलाच श्रीलंका दौरा आहे. पण सूर्यकुमार यादवचा मागचा कर्णधारपदाचा अनुभव भुवया उंचावणारा आहे. मुंबई स्टेट संघाचं कर्णधारपद असताना संघ सहकार्यांनी त्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्याला 2015 साली कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. हाच धागा पकडून सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने आपल्या शैलीत उत्तर दिलं.
“तेव्हापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. मी आता एक वेगळा व्यक्ती आहे.”, असं सूर्यकुमार यादवने एएफपीशी चर्चा करताना सांगितलं. “माझं लग्ल झालं आहे. मी इतर कर्णधारांकडून बरंच शिकलो आहे. मी माझ्या संघाला माझ्या शैलीत पुढे घेऊन जाईल.”, असं सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला. “आमचा क्रिकेटचा ब्रँड आहे तसाच आहे. फक्त कर्णधारपदाची जबाबदारी माझ्याकडे आली आहे. आता मी आव्हानाची वाट पाहत आहे.”, असं सूर्यकुमारने स्पष्ट केलं.
सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरशी असलेल्या नात्याबाबतही सांगितलं, “हे नातं खूप वेगळं आहे.2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात आयपीएल खेळलो आहे. तेव्हा मला संधी मिळाली होती. हे नातं आजही मजबूत आहे. त्याला माहिती आहे मी कसं काम करतो ते. जेव्हा सराव शिबिरात येतो तेव्हा काय मानसिकता असते. मला माहिती आहे की कोच म्हणून तो कसं काम करण्याचा प्रयत्न करतो ते..हे एक नातं असून पुढे कसं जातं याबाबत मी उत्साही आहे.”, असं सूर्यकुमारने सांगितलं.
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : पाथुम निसांका, चामिंडू विक्रमसिंघे, अविष्का फर्नांडो, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शानाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चंडीमल (विकेटकीपर), माथेशा, माथेशा, माथेशा. , बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो, दिलशान मधुशंका.