भारत आणि बांग्लादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही दुसरी मालिका आहे. श्रीलंकेला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने क्लिन स्वीप दिला होता. त्यामुळे बांगलादेशला तसंच लोळवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या मालिकेपूर्वी संघ व्यवस्थापनासमोर एक अडचण येऊन उभी ठाकली आहे. कारण भारतीय संघात रेग्युलर ओपनर म्हणून फक्त अभिषेक शर्माची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला कोण उतरणार? हा प्रश्न उभा राहिला आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सबा करीमने याबाबत एक भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. कारण त्याने ओपनिंगसाठी थेट रिंकु सिंहचं नाव घेतलं आहे. त्यामुळे आता अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला रिंकु सिंह उतरणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. सबा करीमने सांगितलं की, बांगलादेशविरुद्ध रिंकु सिंहला ओपनिंग करताना पाहू इच्छित आहे. रिंकु सिंह फिनिशर म्हणून संघात भूमिका बजावत आहे. पण सबा करीमच्या मते, रिंकुला जास्त चेंडू खेळायला मिळत नाहीत. त्यामुळे त्याला वर पाठवून पुरेपूर फायदा करून घेणं गरजेचं आहे.
सबा करीमने जिओ सिनेमावर बोलताना सांगितलं की, ‘भारताकडून अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला रिंकु सिंह येण्याची शक्यता आहे. रिंकुला आतापर्यंत जी काही संधी मिळाली तेव्हा तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर आला आहे. तसेच त्याला कठीण चेंडूंचा सामना करावा लागाला आहे. रिंकु सिंह हा एक परिपूर्ण खेळाडू आहे. त्याला खेळण्याची संधी मिळायला हवी. त्याच्याकडून संघाला जास्तीत जास्त योगदान मिळू शकते. त्यामुळे त्याला वर खेळण्याची संधी मिळण्याची सर्वाधिक शक्यता आहे.’
दरम्यान, या संघात संजू सॅमसनची निवड केली गेली आहे. त्यामुळे अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन ओपनिंगला उतरू शकतो. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 5 टी20 सामन्यात ओपनिंग केली आहे. पण या पाच सामन्यात एकूण 105 धावा केल्या आहेत. यात 77 धावांची खेळी त्याने आयर्लंडविरुद्ध केली होती. त्यानंतर संजू सॅमसनला श्रीलंकेविरुद्ध ओपनिंगची संधी मिळाली होती. तेव्हा त्याला आपलं खातंही खोलता आलं नव्हतं. दुसरीकडे, रिंकु आणि संजू व्यतिरिक्त या संघात जितेश शर्माही आहे. त्यामुळे त्यालाही संधी मिळू शकते. त्यामुळे आता कोणाला संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
बांग्लादेशविरुद्ध टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकु सिंह, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि मयंक यादव.