जे धोनी-कोहली आणि द्रविडसाठी अशक्य ते रिषभ पंतने करुन दाखवलं

| Updated on: Jan 19, 2021 | 5:43 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला आहे.

जे धोनी-कोहली आणि द्रविडसाठी अशक्य ते रिषभ पंतने करुन दाखवलं
Follow us on

ब्रिस्बेन : रंगतदार झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (Aus vs Ind 4th Test) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने बॉर्डर गावसकर मालिका (Border Gavaskar Trophy) जिंकली. रिषभ पंत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. सामना रंगतदार स्थितीत असताना रिषभ पंतने (Rishabh Pant ) निर्णायक भूमिका बजावली. पंतने नाबाद 89 धावांची विजयी खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून व्हिलन ठरलेला पंत या शानदार खेळीमुळे हिरो ठरला आहे. (Rishabh Pant 89 plus score more than once in the fourth innings saving or winning Test)

आजचा सामना ऐन रंगतदार स्थितीत होता. पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदरसह महत्वपूर्ण भागदीरी केली. या दरम्यान त्याने अर्धशतकही लगावलं. एकाबाजूला टीम इंडियाचे विकेट्स जात होत्या. सामना रोमांचक स्थितीत पोहचला होता. मात्र पंतने आपली भूमिका चोखपणे पार पाडली. पंतने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. पंतने 138 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 1 षटकार लगावत नाबाद 89 धावांची खेळी केली. ही खेळी साकारत असताना रिषभ पंतने एक मोठा कारनामाही केला आहे.

जर कोणी विचारलं की, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी सर्वात अवघड सामना कोणता? यावर कोणीही कसोटी क्रिकेटचं नाव घेईल. तसेच जर कसोटी सामन्यातील सर्वात आव्हानात्मक प्रसंग कोणता याचा विचार केलात तर सर्वजण म्हणतील की, चौथ्या डावात फलंदाजी करणं सर्वात अवघड असतं. त्यामुळेच जगभरातील अनेक दिग्गज फलंदाज चौथ्या डावात फार चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि प्रामुख्याने कसोटी क्रिकेटध्ये ज्या खेळाडूंची सरासरी खूप चांगली आहे, असे खेळाडू चौथ्या डावात फलंदाजी करताना ढेपाळतात. अनेक दिग्गज फलंदाज चौथ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरतात तेव्हा त्यांची सरासरी आणि स्ट्राईक रेट खाली येतो. परंतु चौथ्या डावात 329 धावा करत टीम इंडियाच्या फलंदाजांनी ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतच्या नाबाद 89 धावांच्या खेळीमुळेच हे शक्य झाले आहे.

23 वर्षीय रिषभ पंतचं नाव आता अशा दिग्गज खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे, ज्यांनी कसोटी सामन्याच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात फलंदाजी करताना विक्रमी कामगिरी केली आहे. चौथ्या डावात 89 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करुन सामन्यात विजय मिळवून देण्याचा किंवा सामना ड्रॉ करण्याचा कारनामा पंतने आतापर्यंत दोन वेळा केला आहे. असा कारनामा यापूर्वी टीम इंडियाचे दिग्गज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी केला आहे. त्यांनी असा कारनामा तब्बल चार वेळा केला आहे. गावसकर यांनी चार वेळा सामन्याच्या चौथ्या डावात 89 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करुन सामना जिंकवला किंवा ड्रॉ केला आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू, विराट कोहली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, महेंद्रसिंह धोनी यांना अशी कामगिरी करता आलेली नाही.

विशेष म्हणजे पंतने ही कामगिरी केवळ 3 डाव आणि 9 दिवसांमध्ये केली आहे. याआधी सिडनी कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात रिषभ पंतने 97 धावा फटकावल्या होत्या. हा सामना ड्रॉ झाला होता. चौथ्या डावात चार वेळा 89 पेक्षा अधिक धावा करुन सामना वाचवण्याचा रेकॉर्ड सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. सोबतच या यादीत दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोघांची नावंदेखील आहेत. सचिन आणि सौरवने दोन-दोन वेळा अशी कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

(Rishabh Pant 89 plus score more than once in the fourth innings saving or winning Test)