मुंबई : विकेटकीपर बॅट्समन म्हणून ऋषभ पंतने टीम इंडियात अल्पवधीतच नावलौकिक मिळवला होता. पण एक अपघात झाला आणि क्रिकेट कारकिर्दीला काही अंशी ब्रेक लागला असंच म्हणावं लागेल. आयपीएल 2023, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023, आशिया कप, वनडे वर्ल्डकप 2023 आणि वर्षभरात झालेल्या अनेक मालिकांसाठी मुकला. त्याची उणीव टीम इंडियाला जाणवली. पण आता ती पोकळी काही अंशी भरून निघाली आहे. पण चाहत्यांना ऋषभ पंतच्या पुनरागमनाची आस लागून आहे. ऋषभ पंतची आक्रमक बॅटिंग शैली चाहत्यांचं आकर्षण राहिलं आहे. पण दुखपतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंत त्या ताकदीने खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रश्नांना ऋषभ पंत याने एका व्हिडीओतून उत्तर दिलं आहे. या व्हिडीओत ऋषभ पंत जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते प्रचंड खूश झाले आहेत. आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करेल असं सांगण्यात येत आहे.
ऋषभ पंतचं 30 डिसेंबरर 2022 रोजी कार अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ पंत गंभीररित्या जखमी झाला होता. पूर्णपणे बरा होण्यासाठी सर्जरी करण्यात आली. यासाठी ऋषभ पंत गेलं वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. आता ऋषभ पंत क्रिकेट संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खुद्द ऋषभ पंतने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ऋषभ पंतच्या गैरहजेरीत दिल्ली कॅपिटल्सची धुरा डेविड वॉर्नरकडे सोपवण्यात आली होती. पण सनराईजर्स हैदराबाद प्रमाणे दिल्लीचे हाल झाले. आयपीएल 2023 मध्ये गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावं लागेल. 14 पैकी 5 सामन्यात विजय, तर 9 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे आयपीएल 2024 मध्ये पुन्हा एकदा ऋषभ पंतकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची दाट शक्यता आहे.
दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला रिटेन केलं आहे. तर आयपीएल 2024 पर्व मार्च एप्रिलमध्ये होणार आहे. यासाठी 3-4 महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तिथपर्यंत ऋषभ पंत पूर्णपणे फिट होईल. आयपीएल 2024 साठी मिनी ऑक्शन 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे.