टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण अफ्रिकेला 30 धावांची गरज असताना काय झालं? रोहित शर्माने श्रेय दिलं या खेळाडूला

| Updated on: Oct 07, 2024 | 2:43 PM

टी20 वर्ल्डकप जिंकून तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र अजून्ही वर्ल्डकपबाबतच्या चर्चा रंगत आहे. एक एक करून काही गोष्टी बाहेर येत आहेत. दरम्यान, रोहित शर्माने अंतिम फेरीत तणावपूर्ण स्थिती होती तेव्हा दक्षिण अफ्रिकेची लय कोणी तोडली? कसं वातावरण शांत झालं? याबाबत सांगितलं.

टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण अफ्रिकेला 30 धावांची गरज असताना काय झालं? रोहित शर्माने श्रेय दिलं या खेळाडूला
Follow us on

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. भारतीय संघ सहज विजय मिळवेल असं वाटत असताना हेनरिक क्लासेनने सामन्याचं चित्र पालटलं. अक्षर पटेलच्या एका षटकात 24 धावा ठोकल्या आणि सामना जवळ खेचून आणला. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक, खेळाडू असो की भारतीय फॅन्स या सर्वांनी आशा सोडून दिल्या होत्या. कारण दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत फक्त 30 धावांची गरज होती. टी20 खेळ पाहता हे सहज शक्य होतं. त्यामुळे भारताचा पराभव निश्चित असंच धरून चाललं होतं. हार्दिक पांड्याने क्लासेनची विकेट काढल्याने सामन्याचा बाजू बदलली. त्यानंतर शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरला बाद केलं. सीमारेषेवर सूर्यकुमार यादवने त्याचा अफलातून झेल पकडला. त्यामुळे भारताला दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकता आला. या विजयाचं श्रेय प्रत्येक खेळाडूला जातं यात काही शंका नाही. पण रोहित शर्माने या सामन्यातील एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट सांगितलं. ऋषभ पंतने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेची लय कशी तोडली ते सांगितलं.

‘जेव्हा दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. त्याआधी आम्हाला एक छोटासा ब्रेक मिळाला होता. ऋषभ पंतने बुद्धिचा वापर करत गुडघ्याला दुखापत झाल्याचं सांगितलं. त्यामुळे या ब्रेकमध्ये त्याच्या गुडघ्याला टेप लावली जात होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन खेळाडूंची आक्रमक खेळीची लय तुटली. कारण लयीत असताना फलंदाजाला कायम लवकर लवकर गोलंदाजी व्हावी असं वाटत असतं. पण मी क्षेत्ररक्षण करत असताना ऋषभ पंत अचानक जमिनीवर पडला.’ असा खुलासा कर्णधार रोहित शर्माने कपिल शर्मा शोमध्ये केला.

‘फिजिओथेरपिस्ट आला होता आणि त्याच्या गुडघ्याला टेप करत होता. क्लासेन पुन्हा सामना सुरू होण्याची वाट पाहत होता. मी असे म्हणत नाही की हे एकमेव कारण आहे, परंतु हे त्यापैकी एक असू शकते. पंत साहेबांनी त्याची हुशारी वापरली आणि गोष्टी आमच्या बाजूने वळल्या.”, असं रोहित शर्माने पुढे सांगितलं. भारताने टी20 वर्ल्डकपच्या सुरुवातीला जेतेपद जिंकलं होतं. त्यानंतर 17 वर्षे हाती काहीच लागलं नाही. दरम्यान आयसीसी चषकांची दुष्काळही 11 वर्षांपासून कायम होता. हा दुष्काळ देखील दूर करण्यास मदत झाली.