मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंतला (Rishabh Pant) पुढील उपचारांसाठी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलंय. पंतला कार अपघातात जबर मार लागला. आता पंतवर लिगामेंट सर्जरी करण्यात येणार आहे. या अपघातामुळे पंतला किमान 6 महिने तरी क्रिकेटपासून दूर रहावं लागणार आहे. त्यामुळे पंतला आयपीएल 2023 ला मुकावं लागू शकतं. त्यामुळे आता पंतला जर वैद्यकीय कारणामुळे आयपीएलला मुकावं लागलं तर त्याला त्याची ठरलेली रक्कम मिळणार का, असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. (rishabh pant if not played ipl 2023 then bcci will paid contract amount)
रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिट्ल्स पंतला एका मोसमासाठी 16 कोटी रुपये देते. मात्र आता पंत आयपीएलमध्ये न खेळल्यास त्याला ती रक्कम मिळणार की नाही, याबाबत आपण जाणून घेणार आहोत. पंत जरी आयपीएल 2023 मध्ये खेळला नाही, तरी त्याला पूर्ण रक्कम मिळेल. फक्त ही रक्कम दिल्ली कॅपिट्ल्स नाही, तर बीसीसीआय देईल.
नियमांनुसार, बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असणाऱ्या खेळाडूंचं विमा असतो. जर खेळाडूला आयपीएलआधी दुखापत होते किंवा अपघात झाला तर सर्व रक्कम ही बीसीसीआय देते.
बीसीसीआयमध्ये या नियमाला 2011 पासून सुरुवात झाली आहे. दीपक चाहर आयपीएल 2022 आधी दुखापत झाली होती. तेव्हा दीपकला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटी रुपयात खरेदी केलं होतं. रिपोर्टनुसार, दीपकला पूर्ण रक्कम मिळाली होती.
दरम्यान ऋषभ पंतवर लिगामेट सर्जरी (Ligament Surgery) होणार आहे. “अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर पंतला मुंबईत शिफ्ट केलं गेलं. तसेच पंतवर प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ परदीवाला हे उपचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
“पंतला झालेल्या लिगामेंटच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया होईल. पंतला त्यानंतर पुढील उपचार होतील. तसेच शस्त्रक्रियेनंतर पंतवर बीसीसीआयचं वैद्यकीय पथकही लक्ष ठेवेल”, अशी माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली.