टीम इंडियात ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बरंच काही घडल्याचं दिसत आहे. बीसीसीआयच्या रिव्ह्यू मिटींगमध्ये जवळपास सर्वच मुद्द्यांवर चर्चा झाली. इतकंच इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ काही जाहीर केलेला नाही. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर संघाची घोषणा केली जाईल असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, रोहित शर्मानंतर कसोटी संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल यासाठी खलबतं सुरु आहेत. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी यासाठी ऋषभ पंतचं नाव सूचवलं आहे. पण त्याला संघाची धुरा मिळेल की नाही अजून स्पष्ट नाही. पण त्या आधीच रणजी ट्रॉफीसाठी त्याच्या खांद्यावर दिल्ली संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतला ही जबाबदारी मिळाल्याने भविष्यात त्याच्याकडे आणखी मोठी जबाबदारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रणजी स्पर्धेसाठी दिल्ली संघाचा स्क्वॉड शुक्रवारी म्हणजेच 17 जानेवारीली घोषित केला जाणार आहे.
23 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीच्या साखळी फेरीचे सामने सुरु होतील. या स्पर्धेत टीम इंडियातील दिग्गज खेळाडू खेळणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनीही या स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतनेही असोसिएशनच्या अध्यक्षांना खेळणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्याच खांद्यावर संघाची धुरा असणार यात काही शंका नाही. दिल्लीला आपला पुढचा सामना सौराष्ट्रासोबत खेळायचा आहे.दुसरीकडे, विराट कोहलीने डीडीसीएला कोणतेच अपडेट दिलेले नाहीत. कोहली आता मुंबईत असून अलिबागमध्ये गृहप्रवेशाची तयारीत व्यस्त आहे. या कार्यक्रमानंतर कोहली अपडेट देण्याची शक्यता आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनची सिलेक्शन कमिटी शुक्रवारी म्हणजेच 17 जानेवारीला संघाची घोषणा करेल. रिपोर्टनुसार, डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या बैठकीत ऋषभ पंतच्या नावावर मोहोर लागेल. दरम्यान, 38 खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी खेळाडूंची निवड केली जाईल.