न्यूझीलंडने भारतात टीम इंडियावर कसोटी मालिकेत 3-0 ने ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंड भारताला मायदेशात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश करणारी पहिलीच टीम ठरली. टीम इंडियाच्या काही अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजांनी तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघेच टेकले. आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे फिरकी गोलंदांजासमोर ढेर झाले. न्यूझीलंडच्या मिचेल सँटनर आणि एजाज पटेल या दोघांनी या ऐतिहासिक मालिका विजयात निर्णायक योगदान दिलं.
न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांचा सामना कसा करायचा? यावर भारतीय फलंदाजांकडे उत्तर नव्हतं. रोहितने न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर 10 च्या सरासरीने धावा केल्या. तर विराट कोहली याने 13 च्या एव्हरेजने रन्स केल्या. टीम इंडियाच्या या 2 अनुभवी खेळाडूंची मायदेशात ही अशी गत झाली. आता टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट आणि रोहितचं काय होईल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात या दोघांची नॅथन लाईन या अनुभवी फिरकीपटूसमोर ‘कसोटी’ असणार आहे. विराट आणि रोहित नॅथनचा कसा सामना करतील? याकडेच साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान एका बाजूला अनुभवी फलंदाज फिरकीसमोर फ्लॉप ठरले. मात्र युवा खेळाडूंनी आश्वासक कामगिरी केली. ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर 49.50 च्या सरासरीने धावा कुटल्या. शुबमन गिल याने 29.50 च्या सरासरीने धावा केल्या. तर यशस्वी जयस्वासने 25.50 च्या एव्हरेजने रन्स केल्या.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.