Video : टीम इंडियात ‘गंभीर’पर्वाला सुरुवात! रोहित शर्माने टाकली दोन षटकं, नेमकं काय झालं? जाणून घ्या

| Updated on: Aug 04, 2024 | 6:58 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना सुरु असून श्रीलंकेने 50 षटकात 9 गडी गमवून 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात खुद्द कर्णधार रोहित शर्माने षटक टाकलं. जाणून घ्या काय झालं ते..

Video : टीम इंडियात गंभीरपर्वाला सुरुवात! रोहित शर्माने टाकली दोन षटकं, नेमकं काय झालं? जाणून घ्या
Image Credit source: video grab
Follow us on

भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. खरं तर मालिकेपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची पायाभरणी सुरु झाली आहे. कारण कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत उतरणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यापासून प्रत्येकाला काही ना काही नवीन जबाबदारी सोपण्याचं काम केलं आहे. तसेच गोलंदाज प्रशिक्षक साईराज बहुतुले यानेही वरच्या फळीतील फलंदाजांना गरजेवेळी षटक टाकावं लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे टी20 मालिकेनंतर हा प्रयोग वनडे मालिकेतही पाहायला मिळत आहे. पहिल्या सामन्यात शुबमन गिलने षटक टाकलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात खुद्द रोहित शर्माने दोन षटकं टाकली. त्यामुळे क्रीडाप्रेमींना टीम इंडियात गंभीर पर्व सुरु झाल्याचा भास होत आहे. रोहित शर्माने यापूर्वी गोलंदाजी केली नव्हती असं काही नाही. यापूर्वीही त्याने गोलंदाजी केली आहे. मात्र बोटाला दुखापत झाल्याने गोलंदाजी करत नव्हता. पण बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्माने पुन्हा एकदा चेंडू हाती घेतला.

रोहित शर्माने 2 षटकात 11 धावा दिल्या. फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. गौतम गंभीरने 2011 वर्ल्डकपची आठवण करून दिली. तेव्हा संघात पाचऐवजी 9 गोलंदाजांचा पर्याय असायचा. भारतीय संघात सध्या अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन प्रमुख गोलंदाज आहेत. आता त्यात रोहित शर्माची भर पडली आहे. जर गरज पडली तर रोहित सुद्धा गोलंदाजी करू शकतो यातून दाखवून दिलं आहे. यापूर्वी रोहित शर्माने गोलंदाजी करण्यास नकार दिला होता. रोहित शर्माने सांगितलं होतं की, ‘नाही..माझ्या बरेच खेळाडू आहेत. गरज पडली तर ते गोलंदाजी करू शकतात. मी तर बॅटिंगवर फोकस करेन.’

रोहित शर्माने यापूर्वी शेवटचं षटक वनडे वर्ल्डकपमध्ये टाकलं होतं. नेदरलँडविरुद्ध 5 चेंडू टाकत एक विकेट घेतली होती. तसेच यापूर्वी 2016 मध्ये गोलंदाजी केली होती. रोहित शर्माने 264 सामन्यात 9 गडी बाद केले आहेत. यात 27 धावा देत 2 गडी बाद करण्याचा सर्वोत्तम रेकॉर्ड आहे.