मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने मोठा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने या मालिकेत शतक आणि अर्धशतक ठोकत नवीन विक्रम रचत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रोहितने विक्रम तर केलेच पण त्यासोबत अनेक खेळाडूंचे विक्रमही मोडलेत.
रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात 80 धावा करत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहे. त्यासोबतच टी-20, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामीला येत 2000 धावा पूर्ण करणारा तो तिसरा सलामीवीर आहे. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टिल आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या नावावर होता.
मार्नस लबुशेन – 31 डाव, बाबर आझम – 34 डाव, स्टीव्ह स्मिथ – 38 डाव, रोहित शर्मा – 40 डाव, जो रूट – 40 डाव, उस्मान ख्वाजा – 40 डाव, दिमुथ करुणारत्ने – 41 डाव, ट्रॅव्हिस हेड – 48 डाव. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 40 डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने आणि ट्रॅव्हिस हेड यांना मागे टाकलं आहे.
कप्तान रोहित शर्मा याने विंडिजविरूद्धच्या 80 धावांच्या खेळीत 2 षटकार मारले. या दोन षटकारांसह रोहितने कसोटीमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत पंटर म्हणजे ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू रिकी पाँन्टिंगला मागे टाकलं आहे. रोहितचे 74 सिक्स झाले असू पाँन्टिंगचे 73 सिक्स आहेत.
टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी चौथ्या दिवशी 365 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर विंडिजने चौथ्या दिवसापर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे विंडिजला विजयासाठी पाचव्या दिवशी आणखी 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला 2-0 मालिका जिंकण्यासाठी 8 विकेट्सची गरज आहे. पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला आहे.