गौतम गंभीर हा आपल्या नावाप्रमाणेच आक्रमक स्वभावासाठी ओळखला होता. याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे गौतम गंभीर संघ सदस्यांसोबत कसा वागतो आणि त्यांच्यात कसा मिसळतो हा प्रश्न आहे. गौतम गंभीरचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा साडे तीन वर्षांचा आहे. म्हणजेच वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत तो संघासोबत असेल. या दरम्यान नवा संघ बांधणीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंना संघात किती स्थान मिळणार हा देखील प्रश्न आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेट कारकिर्द कितपर्यंत असेल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. रिपोर्टनुसार, रोहित शर्मा टीम इंडियासोबत आणखी एक वर्ष राहील असं बोललं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्माची वनडे क्रिकेट कारकिर्द संपुष्टात येईल. यानंतर गौतम गंभीर 2027 वनडे वर्ल्डकपसाठी संघाची बांधणी करताना दिसेल. रोहित शर्माचं वय पाहता पुढच्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणं अशक्य आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर कसोटीत खेळत राहू शकतो. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्णधारपदाची धुरा रोहितच्या खांद्यावर असेल. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
विराट कोहलीने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी वनडे आणि टेस्ट संघात खेळताना दिसणार आहे. पण 2027 वनडे वर्ल्डकप संघात विराट कोहलीचा विचार केला जाईल की नाही याबाबत शंका आहे. कारण विराट कोहली आता 35 वर्षांचा आहे आमि 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत 38 वर्षांचा होईल. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट कोहलीचा वनडे संघात विचार केला जाईल की नाही याबाबत शंका आहे.
गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेण्यापूर्वीच नवा संघ बांधण्याची परवानगी मागितली होती. बीसीसीआयने त्याची ही मागणी मंजूर केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा संपल्यानंतर वनडे संघात बदल होईल यात शंका नाही. पण रोहित शर्मानंतर वनडे संघाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल, हा देखील प्रश्न आहे. सात महिन्यांवर चॅम्पियन्स ट्रॉफी येऊन ठेपली आहे. त्यानंतर रोहित शर्माचा उत्तराधिकारी शोधण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान या स्पर्धेत उपकर्णधारपदाची धुरा ज्या खेळाडूच्या खांद्यावर असेल त्याचा विचार केला जाऊ शकतो.