आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर क्रीडाप्रेमींना टी20 वर्ल्डकपची मेजवानी मिळणार आहे. एकूण 20 संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या शर्यतीत असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया आणखी एका जेतेपदासाठी लढत देणार आहे. सध्या रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळताना चांगलाच फॉर्मात दिसत आहे. संघाला आक्रमक सुरुवात करून देण्यास सज्ज असल्याचं दिसून येत आहे. प्रसिद्ध संगीतकार इडी शीरन आणि होस्ट गौरव कपूर यांच्यासमवेत ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सच्या नुकत्याच झालेल्या एका विशेष कार्यक्रमात क्रिकेटमधील भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नांना रोहित शर्माने उत्तरं दिली. निवृत्तीच्या एका प्रश्नाला उत्तर देत रोहित शर्माने सांगितलं की, “मी निवृत्तीचा विचार केला नाही. पण आयुष्य तुम्हाला कोणत्या वळणावर नेऊन ठेवेल सांगता येत नाही. मी सध्या खेळत आहे. त्यामुळे मी पुढे जाण्याचा विचार करत आहे. आणखी काही वर्षे मी खेळणार आहे. पण पुढे काय ते माहिती नाही.”
वर्ल्डकपबाबतही रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं. रोहित शर्मा म्हणाला की, “मला काहीही करून वर्ल्डकप जिंकायचा आहे आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025. आशा आहे की आम्ही हे करून दाखवू.” वनडे वर्ल्डकपबाबतही त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. मागच्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पराभूत झाला होता. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं. विजयाचं श्रेय रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन संघाला दिलं. पण भारत काही वाईट खेळला नाही ही बाबही अधोरेखित केली.
“50 षटकांचा वर्ल्डकप माझ्यासाठी खरा वर्ल्डकप आहे. मी हाच वर्ल्डकप पाहात मोठा झालो आहे. खासकरून आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर सर्वकाही घडलं. आम्ही खरंच छान खेळलो तेवढा अंतिम सामना सोडला तर. आम्ही जेव्हा उपांत्य फेरी जिंकलो तेव्हा वाटलं की आता फक्त स्टेप दूर आहोत. आम्ही तिथपर्यंत सर्व काही बरोबर केलं होतं.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. आयपीएल स्पर्धा संपताच टी20 वर्ल्डकप स्पर्धचं वातावरण तयार होईल यात शंका नाही.
भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंड विरुद्ध आहे. त्यानंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध 9 जून रोजी सामना होणार आहे. टीम इंडियाची निवड 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी होणार आहे. या संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या संघात असतील हे जवळपास निश्चित झालं आहे.