मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) युगाची सुरुवात चांगली झाली आहे. जेव्हापासून हिटमॅनने टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून भारत सतत्याने विजयी होत आहे. टी-20 विश्वचषकानंतर त्याने जितक्या सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यात टीम इंडियाने (Team India) एकही सामना गमावलेला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka Cricket Team) T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय नोंदवला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. धर्मशाला येथील विजयासह, रोहित शर्मा मायदेशात खेळवण्यात आलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार बनला आहे. रोहितने 17 व्या सामन्यात विक्रमी 16 वा विजय नोंदवून ऑईन मॉर्गन आणि केन विल्यमसन यांना मागे टाकलं आहे.
एवढंच नव्हे तर रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तिसरी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 आणि त्यानंतर वेस्ट इंडिजचा 3-0 असा पराभव केला होता. टीम इंडियाचा हा T20 सामन्यांमधला सलग 11 वा विजय आहे. भारताने T20 विश्वचषकातील शेवटचे तीन सामने जिंकले आणि त्यानंतर एकही सामना गमावलेला नाही. इतकेच नाही तर 2019 पासून घरच्या मैदानावर भारताचा हा सलग सातवा टी-20 मालिका विजय आहे.
रोहितच्या नेतृत्वाची सर्वांनाच कल्पना आहे. तो एक उत्तम कर्णधार आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाच जेतेपदं पटकावली आहेत. विराट कोहली जेव्हा कर्णधार होता तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत रोहित नेतृत्व करत असे आणि तेव्हाही तो खूप यशस्वी ठरला आहे.
रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली असून तो आता इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना मागे टाकण्यात रोहित यशस्वी झाला आहे. रोहितने मायदेशात म्हणजेच भारतात 17 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 16 सामने भारताने जिंकले आहेत. आतापर्यंत मायदेशात सर्वाधिक T20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहित मॉर्गन आणि विल्यमसन यांच्या पुढे गेला आहे. घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या बाबतीत रोहितने भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांना आधीच मागे टाकलं आहे. रोहितने विराटपेक्षा 3 सामने आणि धोनीपेक्षा 6 सामने जास्त जिंकले आहे.
• रोहित शर्मा – 16 विजय (भारत)
• ऑईन मॉर्गन – 15 विजय (इंग्लंड)
• केन विल्यमसन – 15 विजय (न्यूझीलंड)
• अॅरोन फिंच – 13 विजय (ऑस्ट्रेलिया)
• विराट कोहली – 13 विजय (भारत)
इतर बातम्या